लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानुसार, राज्यातील धार्मिक स्थळांवरील ६ हजारांहून अधिक बेकायदा भोंगे हटवण्यात आले असून, आणखी ३० हजार भोंग्यांचा आवाज परवानगीयोग्य (पर्मिसिबल) मर्यादेत बसवण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

धार्मिक स्थळांवरील बेकायदा ध्वनिवर्धक हटवण्यासाठी आणि इतर ध्वनिवर्धकांचा आवाज परवानगीयोग्य मर्यादेत बसवण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात आलीआहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली. कुठल्याही भेदभावाशिवाय सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

या मोहिमेंतर्गत, बुधवार दुपापर्यंत ६०३१ भोंगे हटवण्यात आले आणि २९,६७४ भोंग्यांचा आवाज योग्य त्या मर्यादेत बसवण्यात आला, असे कुमार यांनी सांगितले.

‘हटवण्यात येत असलेले भोंगे बेकायदेशीर आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती परवानगी न घेता बसवण्यात आलेल्या, किंवा मंजूर संख्येपेक्षा अधिक संख्येत बसवण्यात आलेल्या भोंग्यांचे वर्गीकरण बेकायदेशीर असे करण्यात आले आहे. ध्वनिवर्धकांबाबत उच्च न्यायालयाचे आदेशही मोहिमेदरम्यान विचारात घेण्यात येत आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘लोकांना त्यांच्या धर्माला अनुसरून धार्मिक परंपरांचे पालन करण्याचा अधिकार आहे. यासाठी ध्वनिवर्धकांचा वापर करता येऊ शकतो, मात्र त्यांचा आवाज कुठल्याही परिसराबाहेर येऊ नये हे सुनिश्चित केले जायला हवे. लोकांना यामुळे कुठलाही त्रास व्हायला नको’, असे

गेल्या आठवडय़ात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यस्थेच्या संबंधांत घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याबाबत गृह मंत्रालयाने सर्व जिल्ह्यांकडून ३० एप्रिलपर्यंत अनुपालन अहवाल मागवला आहे.