माकडांपासून वाचण्यासाठी भाजपा नेत्याच्या पत्नीने दुसऱ्या मजल्यावरुन मारली उडी; जागीच मृत्यू

घरातील काहीतरी काम असल्याने भाजपा नेत्याची पत्नी घराच्या गच्चीवर गेली होती. मात्र त्याच वेळेस आजूबाजूच्या झाडांवरुन माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला.

uttar pradesh Shamli Monkey Attack
माकडांच्या टोळक्याने केला हल्ला (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य द इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)
उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैरानामधील स्थानिकांमध्ये माकडांची फारच दहशत आहे. या ठिकाणी लोकवस्तीमध्ये येऊन माकडं धुडगूस घालत असून लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माकडांची दहशत इतकी आहे की माकडांपासून वाचण्याच्या नादात भाजपा नेत्याच्या पत्नीचा दूर्देवी मृत्यू झालाय. घरातील काहीतरी काम असल्याने भाजपा नेत्याची पत्नी घराच्या गच्चीवर गेली होती. मात्र त्याच वेळेस आजूबाजूच्या झाडांवरुन माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. माकडांपासून वाचण्यासाठी या महिलेने थेट दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला. लोकप्रतिनिधीच्या पत्नीचाच माकडांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

कैराना येथील भाजपाचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकुम सिंह यांचे भाचे तसेच वरिष्ठ भाजपा नेते अनिल चौहान यांच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला. सुषमा देवी असं अनिल चौहान यांच्या पत्नीचं नाव आहे. सुषमा या ५० वर्षांच्या होत्या. मंदिरामधून पुजा करुन आल्यानंतर सुषमा देवी घरातील काही कामासाठी गच्चीवर गेलेल्या त्याचवेळेस माकडांच्या एका टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांपासून वाचण्यासाठी त्यांनी गच्चीवरुन खाली उडी मारली. आरडाओरड आणि गोंधळ ऐकल्यानंतर घरातील व्यक्ती बाहेर आल्या तेव्हा त्यांना सुषमा या अंगणामध्ये पडलेल्या आढळून आल्या. सुषमा यांना तातडीने शामली येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृतावस्थेत आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं, न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

सुषा देवी या वॉर्क क्रमांक १३ मधून पंचायत सदस्य राहिल्या आहेत. भाजपा नेत्याच्या पत्नीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने या परिसरामध्ये या घटनेची चांगलीच चर्चा आहे. अनेकजण सध्या अनिल चौहान यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत. सुषमा यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले असून या अंत्यसंस्काराला गावकऱ्यांबरोबरच स्थानिक राजकीय नेते मंडळीही उपस्थित होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttar pradesh shamli monkey attack bjp leader wife died in accident scsg