योगी आदित्यनाथांविरोधात याचिका करणाऱ्याला सामूहिक बलात्काराप्रकरणी अटक

४ जून रोजी ४० वर्षांच्या महिलेने परवेझ व आणखी एका विरोधात राजघाट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात २००७ मधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या परवेझ परवाझ याला पोलिसांनी सामूहिक बलात्काराप्रकरणी अटक केली आहे.

जून महिन्यात परवेझ परवाझ आणि त्याच्या मित्राविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत माहिती देताना महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी शालिनी सिंह म्हणाल्या, ४ जून रोजी ४० वर्षांच्या महिलेने परवेझ व आणखी एका विरोधात राजघाट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते, असे शालिनी सिंह यांनी सांगितले.

न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर महिलेचा जबाब घेण्यात आला होता. यात तिने सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांची नावे सांगितले होते. यानंतर आम्ही परवेझविरोधात पुरावे गोळा केले आणि शेवटी मंगळवारी गोरखपूरमधून त्याला अटक केली, असेही सिंह यांनी सांगितले. परवेझच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

परवेझ यांच्यावतीने वकील एस फरमान नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली. दोन दिवसांपूर्वी अटकेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयात केली होती. राजघाट पोलिसांनी या प्रकरणात पुरावे नसल्याचे सांगत क्लोजर रिपोर्ट तयार केला होता. मात्र, हा रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला नव्हता. शेवटी हे प्रकरण राजघाट पोलिसांनी महिला पोलीस ठाण्यात वर्ग केले, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. २००७ मध्ये मोहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान हिंदू आणि मुस्लीम गटात झालेल्या चकमकीत एक हिंदू युवक ठार झाला होता. तत्कालीन खासदार आदित्यनाथ यांच्या भाषणानंतर गोरखपूरमध्ये दंगली उसळल्या होत्या. या प्रकरणी आदित्यनाथ यांना अटकही करण्यात आली होती.मे २०१७ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने या खटल्यात कारवाई करण्यास अनुमती नाकारली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. यात परवेझ हे याचिकाकर्ते होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttar pradesh yogi adityanath hate speech case complainant arrested in gangrape case