Uttarakhand Badrinath Helicopter Crash : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथवरून जोशीमठकडे जाणारे एक हेलिकॉप्टर अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) घडली आहे. या हेलिकॉप्टरमधून सहा जण प्रवास करत होते. या घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पायलटसह ६ जणांचा मृत्यू
प्रतिकूल हवामानामुळे भाविकांना घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह एकूण ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण उत्तराखंड आणि तीर्थक्षेत्र परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, जोशीमठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मनोहर कन्याल यांच्या माहितीनुसार, दुपारी २:२१ वाजता जोशीमठच्या एसडीएमकडून अशी माहिती मिळाली की जोशीमठ परिसरातील चाई गावाच्या परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळलं (क्रॅश लँडिंग झालं). याबाबत पुढील माहिती घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या संदर्भात उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, ट्रान्स भारत कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचं लोकेशन चाई गावाच्या भागात लष्करी तळाजवळ दिसून येत आहे. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथवरून सहस्त्रधाराच्या दिशेने जात होतं. दरम्यान, या हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि एक वैमानिक असे एकूण सहा जण होते. ही घटना घडल्यानंतर जोशीमठ आणि पांडुकेश्वर येथील एसडीआरएफची (SDRF) पथके संबंधित ठिकाणाच्या दिशेने रवाना झालेले आहेत असं वृत्तात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काय म्हटलं?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं की, “जोशीमठजवळील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बचाव कार्य सुरू आहे. मी स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी तातडीने हवाई मार्गे हलवण्याचे निर्देश दिले आहेत. मी देवाकडे सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो”, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
