Chamoli Loco Train Accident : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) च्या विष्णुगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पात दोन लोको ट्रेनची टक्कर झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९:३० च्या सुमारास घडली आहे. बोगद्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या दोन लोको ट्रेनची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात ६० कामगार जखमी झाले आहेत.

दोन लोको ट्रेनची समोरासमोर धडक झाल्यानंतर बोगद्यात मोठा आरडाओरडा झाला आणि गोंधळ उडाला. त्यानंतर कामगारांनी बाहेर पडण्यासाठी पळापळ केली. या घटनेची माहिती मिळताच प्रकल्प व्यवस्थापनाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

चमोलीचे जिल्हाधिकी गौरव कुमार यांनी सांगितलं की, “मंगळवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास कामगारांची शिफ्ट बदलताना बोगद्यात धावणाऱ्या दोन लोको ट्रेनची टक्कर झाली. दोन्ही गाड्यांमध्ये एकूण १०९ कामगार होते. त्यापैकी ६० जण जखमी झाले आहेत. त्यातील ४२ जणांना जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”

बोगद्यात काम करताना लोको ट्रेनचा वापर

अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, “बांधकाम कामाच्या दरम्यान कामगार, अधिकारी आणि साहित्य वाहून नेण्यासाठी बोगद्यांच्या आत सामान्यतः लोको ट्रेनचा वापर केला जातो.” दरम्यान, या घटनेबाबत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घटनेची पुष्टी केली. ते म्हणाले की, बहुतेक कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर काही गंभीर जखमी कामगारांना विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं आहे. सर्व डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”

दरम्यान, चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवर ४४४ मेगावॅट क्षमतेच्या विष्णुगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाचं काम सुरू आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात असलं तरी या घटनेची प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.