उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रलयातील मृतांचा आकडा बुधवारी ३२ वर पोहोचला आहे. या ठिकाणी चार दिवसांपासून ६०० जवान शोधकार्य आणि मदतकार्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. मात्र, अद्यापही जवळपास १७० जण बेपत्ता आहेत. एकीकडे मदतकार्य सुरु असतानाच दुसरीकडे या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या आणि मरण पावलेल्यांसंदर्भात अंगावर काटा उभा करणारे घटनाक्रम समोर येत आहे. उत्तराखंडमधील पोलीस खात्यातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूसंदर्भातील अशीच एक माहिती आता समोर आलीय. मनोज चौधरी या ४२ वर्षीय मुख्य हवालदाराचा मृतदेह या दूर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सापडला. मनोज हे ज्या ठिकाणी तैनात होते तिथून हा मृतदेह तब्बल ११० किमी दूर म्हणजेच कर्णप्रयाग येथील अलकनंदा आणि पिंडार नदीच्या संगामजवळ आढळून आला.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार मनोजच्या थोरल्या भावाने म्हणजेच अनिल चौधरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. “घडलेली घटना दुखद असली तरी माझ्या भावाचा मृतदेह आमच्या पूर्वजांचे विधी ज्या नदीच्या संगमावर होतात तिथेच सापडली. हा घाट आमच्या पूर्वजांचे गाव असणाऱ्या कनौडी गावाजवळ आहे. ऋषि गंगा नदी धौली गंगा नदीला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी हा घाट असून पुढे ही संगम अलकनंदा नदीला जाऊन मिळतो,” असं मनोज यांच्या भावाने म्हटलं आहे.

आणखी वाचा- उत्तराखंड प्रलय: तपोवन बोगद्यातून बचावलेल्या कामगारांनी केलं थरारक प्रसंगाचं कथन

मला फोन आला आणि…

२० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलीस दलामध्ये सहभागी झालेल्या मनोज यांनी उत्तराखंड वेगळं राज्य निर्माण झाल्यानंतर डोंगराळ भागामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जानेवारीच्या मध्यापर्यंत ते गोपेश्वर येथे पोलीस लाइन्स येथे ड्युटीवर होते. ही दूर्घटना घडण्याच्या १५ दिवस आधीच त्यांची नियुक्ती ऋषि गंगा पॉवर प्रोजेक्टजवळ करण्यात आलेली. “मनोज आणि त्याच्यासोबत असणारा त्याचा एक सहकारी ऋषि गंगा येथील पोस्टमधून बेपत्ता झाल्याची माहिती देणारा फोन मला पोलीस खात्याकडून आला. त्यानंतर मी घटनास्थळी पोहचलो तेव्हा मला पोलीस खात्यामधील व्यक्तींनी पूराच्या पाण्यासोबत मनोज आणि काही सहकारी वाहून गेल्याची माहिती दिली. मी घरी पोहचल्यानंतर मला कर्णप्रयागमध्ये सापडलेल्या चार मृतदेहांचे फोटो पोलिसांच्या माध्यमातून पाठवण्यात आले. त्यापैकी एक मृतदेह मनोजचा होता. आता मनोजच्या जागी त्याच्या पत्नीला नोकरी दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असं अनिल यांनी सांगितलं.

आणखी वाचा- इस्रो शोधणार उत्तराखंडमधील प्रलयाचं नेमकं कारण; २०० लोक अद्यापही बेपत्ता

नक्की काय घडलं

मनोज आणि त्यांचे सहकारी हवालदार बलबीर सिंह गडिया (५८) हे दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले तेव्हा त्याच्यासोबत तैनात अशणाऱ्या देहरादूनचे पोलीस हवालदार सुरेश भंडारी आणि हवालदार दीपराज यांनी नक्की काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. “दीपराज आणि मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ तैनात होतो तर मनोज आणिल बलबीर या दोघांना पॉवर प्लॅण्टच्या मुख्य खोलीजवळ सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. मी रेणी गावाच्या बाजूने येणारा मोठा आवाज ऐकला आणि पुढच्या क्षणी आम्हाला धुळीचे लोट दिसू लागले. मी आणि दीपराज रस्त्याच्या दिशेने पळू लागलो. आम्ही बलबीर आणि मनोज यांना हाका मारुन बाहेर येण्यास सांगितलं, मात्र ते अडकून पडल्याने बाहेर आलेच नाहीत,” असं सुरेश भंडारी या हवालदाराने सांगितलं.

आणखी वाचा- बोगद्यातील छिद्र आणि मोबाइल फोन ठरला ‘त्या’ १६ मजुरांसाठी तारणहार

मुख्यमंत्री म्हणाले…

उत्तराखंड पोलिसांचे प्रमुख प्रवक्ते नीलेश आनंद यांनी या दोघांच्या कुटुंबियांना सरकारी नियमानुसार मोबदला दिला जाईल असं म्हटलं आहे. बुधवारी मनोज आणि बलबीर या दोघांवरही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली. अशा दूर्देवी घटनेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू होणं हे खूपच धक्कादायक असतं असं मत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मांडलं.