काँग्रेसमुक्त भारताचा वसा घेतलेल्या भाजपच्या उत्तराखंडमधील आमदारांकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्यामुळे उत्तराखंड आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकीय हालचालींना शनिवारी प्रचंड वेग आला. काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांसह ३५ आमदारांचा गट सध्या नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे. काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्तास्थापनेचा दावा केल्याने काही दिवसांपूर्वी अरूणाचल प्रदेशमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती उत्तराखंडमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी सभागृहात आपल्याकडे अजूनही बहुमत असल्याचे सांगत भाजपचा दावा फेटाळून लावला. दरम्यान, काल भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल के.के. पॉल यांची भेट घेऊन रावत यांचे अल्पमतातील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. रावत यांच्या कार्यशैलीमुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील आमदारांचा एक गट असंतुष्ट असल्याचीही चर्चा आहे.