Uttarakhand Gym owner Mohamad Deepak: उत्तराखंडच्या कोटद्वार येथे एका मुस्लीम दुकानदाराची बाजू घेणे दीपक कुमार नावाच्या जिम चालकाला चांगलेच भारी पडले आहे. मुस्लीम दुकानदाराला वाचवताना दीपकने स्वतःचे नाव मोहम्मद दीपक असल्याचे सांगितले. यानंतर आता दीपकला याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम भोगावे लागत असून त्यावर बहिष्कार टाकला जात आहे. दीपक जिममधून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत होता. त्याच्या जिममध्ये १५० सदस्य होते, ही संख्या घटून आता १५ वर आली आहे. मुस्लीम दुकानदाराला वाचविण्याची किंमत दीपक कुमारला चुकवावी लागत असल्याचे बोलले जात आहे.
प्रकरण काय आहे?
२६ जानेवारी रोजी उत्तराखंडच्या कोटद्वार येथे बाबा गारमेंट्स या दुकानाजवळ बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटनांचे लोक जमा झाले. सदर दुकान मुस्लीम व्यक्तीचे असल्यामुळे संघटनांनी दुकानाच्या नावातून बाबा हे नाव काढण्यासाठी दुकानदारावर दबाव टाकला. बाबा हे नाव मुस्लीम दुकानदार ठेवू शकत नाही, अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होती. कोटद्वार येथे सिद्धबली नावाचे हनुमानाचे मंदिर आहे. ज्याला सिद्धबली बाबा असेही म्हटले जाते. याच बाबा नावामुळे हा वाद निर्माण झाला.
दीपक कुमार वादात का अडकला?
बाबा गारमेंट्स दुकानाचे मालक वकील अहमदशी जेव्हा जमाव हुज्जत घालत होता, तेव्हा दीपक कुमार तिथे पोहोचला. त्याने बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सामना केला. वकील अहमदला वाचवत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्याचे नाव विचारले. तेव्हा त्याने स्वतःचे नाव मोहम्मद दीपक असल्याचे म्हटले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोटद्वारच्या बाजारातील ही घटना देशभर व्हायरल झाली.
३१ जानेवारी रोजी जिमसमोर आंदोलन
२६ जानेवारीच्या घटनेनंतर ३१ जानेवारी रोजी हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा गारमेंट्स आणि दीपक कुमारच्या जिमसमोर गोळा झाले. त्यांनी दीपक कुमार विरोधात घोषणाबाजी केली. ज्यामुळे तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना पांगवले.
कोटद्वारच्या बद्रीनाथ मार्गावर असेल्या हल्क जिमचे मालक दीपक कुमार आता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. जिमच्या सभासदांची संख्या १५० वरून १५ वर आल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दीपक यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला, ज्यात ते म्हणाले, जिमचे मासिक भाडे ४०,००० रुपये आहे. घरावरील कर्जाचा हप्ता १६,००० रुपये आहे. घराचा खर्च भागविण्यासाठी त्यांच्या ७० वर्षीय आईला आजही चहाचे दुकान चालवावे लागत आहे. अशातच जिममधील सदस्यांची संख्या कमी झाल्यामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

