उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी परिसरात २९ वर्षीय तरुणाने आपल्या दोन बहिणींवर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत बहिणीचा पतीही गोळी लागून जखमी झाला. पोलिसांनी आरोपी विवेक कुमार उर्फ विक्की याला मंगळवारी अटक केली. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भगवानपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चुडियाला गावातील रहिवासी आहे. त्याने प्रथम प्रीत विहार परिसरात राहणारी आपली मोठी बहीण संगीता हिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुभाष नगर येथे राहणाऱ्या धाकट्या बहिणीच्या पुष्पा हिच्या घरी गेला आणि तिच्यावरही गोळीबार केला.
भाऊजीलाही गोळी मारली
पुष्पाचा पती आणि आरोपीचा भाऊजी संदीप यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विवेकने त्यांच्यावरही गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळी लागल्याने संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी एम्स ऋषिकेश येथे हलवण्यात आले.
पोलिसांनी आरोपीकडून ३१५ बोअरची देशी पिस्तूल आणि सहा रिकाम्या काडतुसांचे खोके जप्त केले. हे शस्त्र त्याने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून मिळवल्याचा पोलिसांचा दावा आहे.
बहिणींच्या चारित्र्यावर संशय
हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या हत्यांमागे बहिणींच्या चारित्र्याबाबत आरोपीला असलेला संशय आणि मालमत्तेचा वाद असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विवेकला आपल्या बहिणींच्या वर्तनाबाबत संशय होता. त्यांच्या वर्तनामुळे कुटुंबाची समाजात बदनामी होत असल्याचा त्याचा समज होता.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
संगीता यांचा मुलगा अर्जुन सिंह याच्या तक्रारीवरून गंगानहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी भुल्लर यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी संदीप यांना रुग्णालयात दाखल केले. आरोपीला मंगळवारी संध्याकाळी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विवेक पूर्वी कोचिंग सेंटर चालवत होता. त्याच्यावर यापूर्वी पेपर लीक प्रकरणातही गुन्हा दाखल झाला असून कंकरखेडा पोलिस ठाण्यातील त्या प्रकरणात त्याला अटक होऊन तुरुंगात जावे लागले होते.
