उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि त्यातून निर्माण झालेली पूरस्थिती असा घटना घडल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळी राज्यभर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ४६ लोकांना आपले प्राण गमवाले लागले आहेत. त्यासोबतच, अनेकजण बेपत्ता असल्याची देखील माहिती मिळत आहे. उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी देखील आज पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीची माहिती दिली. “प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ११ जण बेपत्ता आहेत. काही जण जखमी देखील जाले आहेत. एकूण मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे”, असं ते म्हणाले. दरम्यान, पाऊस आता कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. “पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुन्हा सर्व सुरळीत व्हायला वेळ लागेल. रस्ते वाहून गेले आहेत, दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांनी आपले मार्ग बदलले आहेत. गावांना फटका बसला आहे, पूल कोसळले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत देण्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय, स्थानिक पातळीवर बचाव आणि दुरुस्ती कार्य तातडीने केलं जावं, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने १० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. “रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आम्ही सुरक्षित स्थळी आणत आहोत. चारधाम यात्रेच्या ठिकाणी देखील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

यमुनोत्री-गंगोत्री यात्रेला सुरुवात!

पावसानं काही काळ विश्रांती घेतल्यामुळे बचावकार्यानं वेग घेतला आहे. रस्ते काही प्रमाणात मोकळे करून काही ठिकाणची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यमनोत्री आणि गंगोत्री, तसेच केदारनाथ धाम यात्रा देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, जोशीमठाजवळ बद्रीनाथ महामार्ग बंद असल्यामुळे बद्रीनाथ यात्रा मात्र अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, लवकरात लवकर ती देखील सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांकडून ट्विटरवर देण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झालेल्या ठिकाणी एसडीआरएफ आणि इतर बचावपथकांकडून वेगाने बचाव कार्य केलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand heavt rainfall flood situation roads block amit shah visit pmw
First published on: 20-10-2021 at 12:18 IST