Rudrapur Uttarakhand Namaz Controversy: उत्तराखंडमध्ये वयस्कर मुस्लिम व्यक्तीला माराहण करुन धार्मिक घोषणा देण्यास भाग पडल्याची घटना समोर आली आहे. ‘मुस्लिम व्यक्तीने मंदिरासमोरील खुल्या जागेत नमाज अदा केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे’, अशी माहिती पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. रुद्रापूर येथे ही घटना घडली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पीडित व्यक्तीला मारहाण केल्याचे दिसत आहे. ‘मूळ जगतपुरा येथील रहिवासी असणाऱ्या शाहिद नावाच्या व्यक्तीने अत्रिया मंदिरासमोर नमाज अदा केली. रमजान महिना सुरु असल्याने त्याने नमाज अदा केली’, असे पोलिसांच्या हवाल्याने पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

नमाज अदा करणारी व्यक्ती काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून शाहिद या भागात काम करत आहेत. नमाज अदा केली तिथून मंदिर खूप दूर आहे, असे शाहिद यांनी म्हटले आहे. मारहाणीची घटना उघडकीस आल्यानंतर मुस्लिम समाजातील नागरिकांनी शाहिदबरोबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘या घटनेतील एक संशयित खून प्रकरणातील दोषी असून, सध्या पॅरोलवर बाहेर आहे’. 

मंदिर व्यवस्थापकांची भूमिका काय?

आमच्याविरोधात तक्रार दाखल केली तरी मंदिराच्या जागेवर इतर धर्मीयांना उभं केलं जाणार नाही, असे मंदिराचे व्यवस्थापक अरविंद शर्मा म्हणाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. शाहिद यांची वैद्यकीय तपासणी करुन तक्रारीनुसार कायदेशीर करवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे.

राजकीय पडसाद

नगरसेवक परवेज कुरेशी यांनी या घटनेप्रकरणी निषेध नोंदवला आहे. ‘हा प्रकार अतिशय गंभीर आहे. व्यक्तीला मारहाण योग्य नाही. कोणाला आक्षेप असेल तर, प्रशासनाला माहिती द्यायला हवी होती. याप्रकरणी पारदर्शक तपास करुन दोषींनी कठोर शासन करावे, जेणेकरुन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत’, अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी पीटीआयला दिली. काँग्रेस नेत्या सोफिया नाझ यांनी देखील या घटनेची तीव्र निषेध केला.