उत्तराखंडमधील लामखागा खिंडीत हवाई दलाचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. लामखागा खिंडीत १७ हजार फूट उंचीवर, ट्रेकिंगसाठी गेलेले खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे आपला रस्ता चुकले होते. १८ ऑक्टोबर रोजी १८ गिर्यारोहक लामखागाजवळ हिमालयीन ट्रॅकवर गेले होते. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे काही सदस्य हरवले. तेव्हापासून सर्व बेपत्ता आहेत. मात्र शोधमोहिमेनंतर १२  ट्रेकर्सचे मृतदेह सापडले आहेत. दोघांची सुटका करण्यात आली आहे तर दोघांचा तपास सुरू आहे.

लमखागा खिंडीकडे जाणाऱ्या परिसरातून मदत आणि बचाव पथकांना आतापर्यंत एकूण १२ मृतदेह सापडले आहेत. यानंतर इतर लोकांचा शोध घेतला जात आहे. हिमाचल प्रदेशच्‍या किन्‍नौर जिल्‍ह्याला उत्‍तराखंडच्‍या हरसिलशी जोडणारा लमखगा पास हा सर्वात धोकादायक पास आहे. लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत आहेत.

११ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणांहून आठ पर्यटकांची टीम मोरी सांक्रीच्या ट्रेकिंग एजन्सीद्वारे हर्सिलहून निघाली होती. बुधवारी खराब हवामानामुळे आठ पर्यटकांसह ११ जण बेपत्ता झाले होते. लष्कर आणि हवाई दलाच्या बचाव पथकांनी चितकुलजवळ पाच मृतदेह पाहिले आहेत. शुक्रवारी त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, एका पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी बागेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंडारी, सुंदरधुंगा आणि काफनी हिमनदीत ३४ लोक अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे पिंडारी ग्लेशियर ट्रेकवर पडणाऱ्या दवली गावात १८ पर्यटक, सहा परदेशी नागरिक आणि १० गावकरी अडकले आहेत.

एसडीआरफने १७ पर्यटकांपैकी चार पर्यटकांची सुटका केली आहे. तर १२ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. एसडीआरएफचे एक पथक बेपत्ता पर्यटकांचा पायी शोध घेत आहे. त्याचवेळी हेलिकॉप्टरमधूनही बेपत्ता पर्यटकांचा एसडीआरएफची टीम शोध घेत आहे.

सध्या उत्तराखंडमधील हवामान खूपच खराब आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला आहे.