डेहराडून : उत्तराखंडमधील हृषीकेश-भानियावाला चौपदरी रस्ता प्रकल्पासाठी सुमारे चार हजार झाडांच्या कत्तलीविरोधात उसळलेल्या जनक्षोभापुढे अखेर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी वृक्षतोडीला स्थगिती जाहीर करत, जोपर्यंत सर्व संबंधितांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि एकमत होत नाही, तोपर्यंत काम पुढे नेले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री धामी यांनी समाजमाध्यमावर या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, राज्याचा विकास आवश्यक असला, तरी स्थानिक जनतेच्या भावना, पर्यावरण आणि स्थानिकांचे हित डावलून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. उत्तराखंडचे पर्यावरण, जनतेच्या भावना आणि राज्याचा विकास या तिन्ही गोष्टी माझ्यासाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत सर्व घटकांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि समाधानकारक एकमत होत नाही, तोपर्यंत झाडे कापण्याचे काम स्थगित राहील, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्य सचिव आणि संबंधित अधिकार्यांना पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि इतर संबंधितांशी नव्याने सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी व्यक्त केलेल्या चिंता व सूचनांची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (एनएचएआय) हा प्रकल्प उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तसेच आवश्यक वैधानिक आणि पर्यावरणविषयक मंजुरी घेऊन राबविण्यात येत आहे. नव्याने चर्चा करून पुढील कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केली जाईल. – पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड
सरकारचा दावा काय?
या प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी सुमारे ३.५ किलोमीटर लांबीचा भूमिगत मार्ग (अंडरपास) तसेच विशेष कल्व्हर्ट उभारण्याची तरतूद आहे. त्यामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष आणि वन्यप्राण्यांच्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.
राहुल गांधींची मध्यरात्री आंदोलकांशी चर्चा
डेहराडून येथील ह्य्छात्रों की गूंजह्ण या कार्यक्रमातून शुक्रवारी रात्री परतत असताना, ह्य्सात मोडह्ण परिसरात आंदोलन करणार्या नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी राहुल गांधींचा ताफा अडवला. आंदोलकांनी प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावर राहुल गांधी यांनी आंदोलकांना मी हा मुद्दा संसदेत नक्कीच उपस्थित करेन असे आश्वासन देत उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आणि आंदोलकांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश दिले होते.
पर्यावरणप्रेमींचा विरोध का?
* हृषीकेश-भानियावाला हा मार्ग राजाजी राष्ट्रीय उद्यानातील हत्तींच्या संवेदनशील स्थलांतर मार्गातून जात असल्याने चौपदरीकरण प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे.
* गेल्या काही दिवसांपासून ‘सात मोड’ परिसरात स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरण कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. * आंदोलन सुरू असतानाच पोलीस बंदोबस्तात वृक्षतोडीचे काम सुरू असल्याने मोठा असंतोष पसरला. सरकारने आंदोलकांना हटवून गुन्हे दाखल केले होते.
