Yogi Adityanath on Stampede : येथे मौनी अमावस्येनिमित्त पवित्र शाही स्नान करण्याच्या उद्देशाने जमलेल्या संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगारचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून, २५ जणांची ओळख पटली आहे. जखमी रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ तुम्ही आहात तिथेच शाही स्नान करा. संगम घाटाजवळ येण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचं पालन करा आणि व्यवस्था टिकवून ठेवण्याकरता सहकार्य करा. तसंच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून जखमींना कुंभच्या सेक्टर २ मधील तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चेंगराचेंगरीनंतर आजचे अमृत स्नान रद्द करण्यात आल्याचे आखाडा परिषदेने जाहीर केले. अधिकाऱ्यांनी भाविकांना संगमात स्नान केल्यानंतर जागा रिकामी करण्याचे आवाहन केले. तसंच, संगम घाटावर जाऊन स्नान न करण्याचे आवाहन करण्यात आले असून नजिकच्या इतर घाटावर जाऊन स्नान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“आम्ही दोन बसमध्ये ६० जणांच्या तुकडीत आलो. आम्ही नऊ जणांच्या ग्रुपमध्ये होतो. अचानक गर्दीत धक्काबुक्की झाली आणि आम्ही अडकलो. आमच्यापैकी बरेच जण खाली पडले आणि गर्दी अनियंत्रित झाली”, कर्नाटकातील सरोजिनी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगम अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे महाकुंभ दरम्यान आणि मौनी अमावस्यासारख्या विशेष स्नानाच्या तारखांमध्ये स्नान करणं पवित्र मानलं जातं. स्नान करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो, असंही म्हणतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarpradesh cm yogi adityanath first reaction on stampede breaks out at maha kumbh 2025 sgk