करोनामुळे शिक्षणक्षेत्राचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. देशात सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दहावी, बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. तसेच अंतर्गत मूल्यांकनावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी शाळा कधी सुरु होणार? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. आता देशातील अनेक राज्यात शाळा सुरु करण्यासाठी पावलं उचलली जात आहे. आता उत्तराखंड सरकारने निर्णय घेत १ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सहावी ते बारावीच्या वर्ग सुरु करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. १ जुलैपासून राज्यातील सर्व शाळा ऑनलाइन सुरु करण्याचे आदेश सरकारने दिले होते. शाळांना ३० जूनपर्यंतची उन्हाळी सुट्टी होती. दुसरीकडे उत्तराखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशन २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलं आहे. यूपीएससी, एनडीए, सीडीएसची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे बिहारमध्येही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.