नवी दिल्ली : जागतिक आर्थिक बाजारात पुन्हा २००८ सारखी वित्तीय संकटाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी दिला. आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ सादर केल्यानंतर ते गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते.

२००८ च्या संकटानंतर जगभर स्वस्त कर्ज सहज उपलब्ध झाले. त्यामुळे शेअर बाजार आणि इतर आर्थिक बाजारात मूल्ये कृत्रिमरीत्या वाढली. भविष्यात एखादा मोठा राजकीय किंवा तांत्रिक धक्का बसला, तर जागतिक बाजार अस्थिर होऊ शकतात. या संकटाला तोंड देण्यासाठी भारताने स्वतःची आर्थिक ताकद वाढवणे आवश्यक आहे, असे नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.

स्वदेशीच्या धोरणाशिवाय भारताला पर्याय नाही, असेही ठाम मत नागेश्वरन यांनी मांडले. ‘स्वदेशी’ धोरणाबाबत संकोच ठेवणे योग्य नव्हे. सध्याच्या जागतिक व्यापार परिस्थितीत आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. अत्यंत गरजेच्या वस्तू आणि तंत्रज्ञानासाठी परदेशावर पूर्ण अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते, असे नागेश्वरन म्हणाले.

उत्पादन उद्योगावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अधिक कारखाने, अधिक निर्यात आणि अधिक रोजगार यासाठी उत्पादन क्षेत्र मजबूत करणे आवश्यक आहे. मात्र, उद्योगांना कायम संरक्षण देणे योग्य नाही. गुणवत्तेत आणि स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जेकडे वळताना मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि संसाधने लागतील. हे पुढील दशकातील मोठे आर्थिक आव्हान ठरेल, असेही नागेश्वरन यांनी सांगितले.

‘एआय’साठी धोरण निश्चिती आवश्यक

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (एआय) संधी आणि जोखीम दोन्हीकडे नागेश्वरन यांनी लक्ष वेधले. कौशल्यातील तफावत, परदेशी ‘एआय’ प्रारुपांवरील अवलंबित्व व कामगारांशी निगडीत अडथळे ही ‘एआय’संदर्भातील आव्हाने ठरू शकतात, असा इशारा नागेश्वरन यांनी दिला. ‘एआय’प्रणित वाढ सर्वसमावेशक राहावी यासाठी शिक्षण, देशांतर्गत तांत्रिक क्षमता आणि माहिती-विदेसंदर्भातील संचालन या मुद्द्यांकडे तातडीने धोरणे निश्चित केली पाहिजे, असेही मत नागेश्वरन यांनी व्यक्त केले.

स्वदेशनितीचा अवलंब योग्य अमेरिकेचे व्यापार धोरण, भारतावर लादलेला आयातकर, व्हेनेझुएला-इराण-ग्रीनलँड आदी देशांमध्ये अमेरिकेमुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आदींच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वदेशनितीचा अवलंब करणेच योग्य ठरते, असे नागेश्वरन यांनी सूचित केले.

‘रुपयाची घसरण प्रत्येकवेळी चिंतेची बाब नाही’

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीबाबत नागेश्वरन म्हणाले की, ही घसरण भारताच्या आर्थिक कमजोरीमुळे नव्हे तर, जागतिक बाजारातून भांडवल काढून घेतले जात असल्याने अनेक देशांच्या चलनांवर दबाव येत आहे. शिवाय, अमेरिकेच्या व्यापार धोरणाचाही परिणाम होत आहे. भारताची आर्थिक स्थिती मात्र मजबूत आहे. रुपयाची घसरण प्रत्येकवेळी चिंतेची बाब नसते. त्याचा निर्यातवाढीसाठी फायदा होऊ शकतो. महागाई वाढण्याची चिंता नसेल, असेही नागेश्वरन यांनी स्पष्ट केले.