…म्हणून ‘तिसऱ्या लाटे’मध्ये करोना मृतांची संख्या कमी; केंद्र सरकारने सांगितलं कारण

आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच वाढलेल्या रुग्णसंख्येचा उल्लेख ‘तिसरी लाट’ असा केलाय.

India reports 3,303 new Corona cases
India reports 3,303 new Corona cases

मागील काही दिवसांपासून देशामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी दुसऱ्या लाटेच्या तुलनेमध्ये मृतांचं प्रमाण कमी आहे. सध्या करोना रुग्ण अधिक असले तरी मृतांचं प्रमाण कमी असण्यामागील मुख्य कारण लसीकरण असल्याचं निति आयोगाचे आरोग्य गटाचे सदस्य असणाऱ्या व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही ६.५ कोटी लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही, असंही पॉल म्हणाले आहेत.

“लोकांनी दुसरा डोसही घेतला पाहिजे. नाहीतर त्यांच्यामुळे करोनाविरुद्धच्या लढ्याची साखळी कमकुवत होईल. जे लसीकरणाच्या माध्यमातून अद्याप सुरक्षित झालेले नाहीत त्यांच्याकडून संसर्गाचा धोका कायम आहे,” असं डॉ पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

यावेळी आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच वाढलेल्या रुग्णसंख्येचा उल्लेख ‘तिसरी लाट’ असा केलाय. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचंही केंद्राने सांगितलं आहे. १९ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील ५१५ जिल्ह्यांमधील करोना संसर्गाचा दर हा ५ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती सरकारने दिलीय.

मुख्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. “३० एप्रिल २०२१ रोजी तीन लाख ८६ हजार ४५२ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्या वेळी तीन हजार ५९ जणांचा मृत्यू झाल होता. तर त्यावेळी देशात ३१ लाख ७० हजार २२८ सक्रीय रुग्ण होते. तेव्हा पूर्ण लसीकरण झालेल्या केवळ दोन टक्के व्यक्ती होत्या. मात्र २० जानेवारी २०२२ रोजीच्या आखेडवारीनुसार देशात तीन लाख १७ हजार ५३२ रुग्ण आढळून आले. ३८० जाणांचा मृत्यू या दिवशी झाला तर देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ५१ इतकी आहे. सध्या पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची टक्केवारी ७२ इतकी आहे,” असं भूषण म्हणाले. “या आकडेवारीवरुन लसीकरणामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे,” असंही भूषण म्हणाले.

याच महिन्यापासून आरोग्य कर्मचारी आणि काही निवडक लोकसंख्येला तिसरा डोस दिला जात असल्याचं मंत्रालयाने सांगितलं. २० जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ६३ टक्के तर पहिल्या फळीत काम करणाऱ्या ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतलाय. तसेच पात्र व्यक्तींपैकी ३९ टक्के वयस्कर लोकांनी तिसरा डोस घेतल्याची माहिती आरोग्यमंत्रालायाने दिलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaccines preventing many covid 19 deaths in third wave government scsg

Next Story
…तर काकांच्या मुलांआधी वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा पहिला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी