Vadodara Car Accident Video goes viral : गुजरातमधील वडोदरा येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या करेलीबाग परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एका भरधाव कारने तीन दुचाकीस्वार आणि रस्त्याने जाणाऱ्यांना धडक दिल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. कार चालवणारा व्यक्ती आणि त्याच्याबरोबरचा दुसरा सहआरोपी हे दोघेही विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघे अपघाताच्या वेळी नशेत होते का? याचा तपास केला जात आहे. वडोदरा येथील आम्रपाली शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जवळ गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षित चौरसिया हा अपघाताच्या वेळी गाडी चालवत होता. त्याने तीन दुचाकींना धडक दिली ज्यामध्ये एका महिलेचा मृ्त्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हिमाली पटेल असून ही महिला होळीसाठी रंग विकत घेण्यासाठी बाहेर गेली होती. याबरोबरच इतर सात जण जखमी झाले आहेत, ज्यामध्ये १० आणि १२ वर्षीय दोन मुलींचा समावेश आहे. जखमी झालेल्या सातपैकी तीन जण गंभीररित्या जखमी आहेत, तर तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

चौरसीया याच्या बरोबर ज्याच्या वडिलांची कार होती तो प्रांशू चौहान हा देखील होता असेही पोलिसांनी सांगितले. स्थानिक लोकांनी पकडल्यानंतर चौरसिया याला जागेवर अटक करणअयात आली. त्यानंतर काही तासांनी अपघातावेळी स्थानिकांनी काढलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून चौहान याला देखील अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार चौरसिया हा एम एस विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे. तर चौहान हा वाघोडिया येथील पारूल विद्यापीठात मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहे.

“करेलीबाग येथील आम्रपाली शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ हा अपघात झाला. एका फोक्सवॅगन ताकने तीन दुचाकींना धडक दिली. आतापर्यंत तपासात सात जण जखमी झाल्याचे आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या सात जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. कार मालकाचा मुलगा घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला… पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि क्राइम सीन मॅनेजर यांनी फॉरेन्सिक आणि सायंटीफिक पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाची तपासणी केली आहे,” असे वडोदराचे पोलिस आयुक्त नरसिंह कोमर यांनी सांगितले.

अपघातानंतरचा व्हिडीओ व्हायरल

या दुर्घटनेनंतरचे आरोपी आणि कारचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहेत. या व्हिजीओमध्ये चौरसिया हा कारमधून बाहेर पडल्यानंतर ओरडताना दिसत आहे. तर चौहान हा स्वतःला सोडवून घेत निघू जाताना दिसत आहे. इतकेच नाही तर चौहान हा अपघातासाठी चौरसिया जबाबदार असल्याचे सांगताना दिसत आहे. तर चौरसिया वारंवार “आणखी एक राऊंड?” अशी विचारणा करताना दिसत आहे. कारमधून बाहेर पडल्यानंतर देखील तो ‘आणखी एक राऊंड आणि ओम नमः शिवाय’ असे ओरडताना आणि इतर घोषणा देताना दिसत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातापूर्वी दोन्ही आरोपींबरोबर असलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.