दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये अंमली पदार्थ आणि अवैध दारूची तस्करी करण्यासाठी तस्करांनी एक अजब आणि धक्कादायक शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. औद्योगिक ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या एका मोठ्या टँकरमधून तब्बल ६४ लाखांची अवैध दारू चोरट्या मार्गाने गुजरातमध्ये आणली जात होती. मात्र, गुजरात पोलिसांच्या राज्य देखरेख कक्षाने एका गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी राजस्थानच्या एका चालकाला अटक केली असून, या रॅकेटचे थेट ‘महाराष्ट्र कनेक्शन’ समोर आले आहे.

२८ हजारांपेक्षा जास्त बाटल्या जप्त

वडोदरा शहरातील हरणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देना चौकडी ते गोल्डन चौकडी या हायवेवर पोलिसांनी हा टँकर अडवला. टँकरची कसून झडती घेतली असता, पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. या टँकरमध्ये तब्बल २८,७०४ भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या (IMFL) बाटल्या आणि कॅन लपवून ठेवण्यात आले होते. बाजारभावानुसार या जप्त केलेल्या दारूची किंमत ६४ लाख ६५ हजार २४ रुपये इतकी आहे.

पोलिसांनी या व्यावसायिक टँकरचा चालक रेखाराम मोताराम जाट (रा. जालोर, राजस्थान) याला घटनास्थळावरूनच अटक केली असून पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

…म्हणून निवडला ऑक्सिजन टँकर! तस्करांची ‘मास्टरमाईंड’ आयडिया

गुजरात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दारूने भरलेला टँकर महाराष्ट्रातून वडोदरा शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. औद्योगिक वायू आणि ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अत्यावश्यक सेवा म्हणून बऱ्याचदा तपासणीतून सूट मिळते किंवा त्यांची कडक चौकशी होत नाही, याचाच फायदा तस्करांना घ्यायचा होता.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तस्करांनी अत्यंत डोकेबाज पद्धत वापरली होती…

टँकरच्या पुढच्या भागात गॅस सिलिंडर आणि कॉम्प्रेसर बसवण्यात आले होते. जेणेकरून सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी व्हॉल्व्ह किंवा प्रेशर गेज तपासले, तरी तिथे सामान्य गॅस वाहतूक होत असल्याचाच भास होईल, या सिलिंडर्सच्या अगदी मागे टँकरमध्ये एक गुप्त कप्पा तयार करण्यात आला होता. या गुप्त कप्प्यातच दारूचा हा प्रचंड साठा लपवण्यात आला होता.

गुन्ह्याची नोंद आणि पुढील तपास सुरू…

पोलिसांनी दारूच्या साठ्यासह संपूर्ण टँकर जप्त केला असून, आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याच्या (Prohibition Act) कलम ६५(A)(E), ८१, ८३, ९८(२) आणि ११६(B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या मोठ्या रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. टँकरचा मालक, महाराष्ट्रातील मुख्य दारू पुरवठादार आणि वडोदरामध्ये हा साठा स्वीकारणारा मुख्य हस्तक यांच्यासह अन्य चार फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.