scorecardresearch

वढेरा प्रकरणामुळे आरोपपत्र दाखल करण्याचा डाव- खेमका

आपले सहकारी अधिकारी असलेले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव एस. एस. धिल्लन यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या

आपले सहकारी अधिकारी असलेले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव एस. एस. धिल्लन यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी या जमीन व्यवहारास परवानगी देण्यात असलेली भूमिका उघड केल्याने धिल्लन यांनी आपल्या विरोधात दुसरे आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी देऊन आपल्याला बळीचा बकरा केले आहे असा आरोप वादग्रस्त आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी केला आहे. हरयाणा सरकार आता आयएएस अधिकारी अशोक खेमका यांच्यावर दुसरे आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. खेमका यांनी अकरा पानांचे पत्र मुख्य सचिव पी. के. चौधरी यांना पाठवले असून त्यांनी त्यात मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव ढिल्लन यांच्यावर टीका केली आहे. ते व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात एकत्र येऊन हा आरोपपत्र दाखल करण्याचा कट केला आहे असे त्यांनी म्हटले आहे. आरोपपत्र दाखल केल्यास आपण राजकीय नेत्यांची बाजू घेऊन त्यांना हवे तसे वागू असा त्यांचा त्यामागे हेतू आहे, असेही खेमका म्हणतात. द इंडियन एक्सप्रेसने १७ ऑक्टोबरला प्रथम असे वृत्त दिले होते की, मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी गव्हाच्या निकृष्ट बियाणाच्या विक्रीस खेमका जबाबदार असून त्यांच्यावर आरोप ठेवण्यास मंजुरी दिली आहे. त्यावेळी १५ ऑक्टोबर २०१२ ते ४ एप्रिल २०१३ दरम्यान खेमका हे हरयाणा बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. खेमका यांच्या विरोधातील आरोपपत्र एस. एस. ढिल्लन यांनी मुख्यमंत्री हुडा यांच्यापुढे ठेवले. त्यावर मुख्य सचिव पी. के. चौधरी यांनी आक्षेप घेतले असतानाही ढिल्लन यांनी ते आरोपपत्र दाखल करण्याचा आग्रह धरला असे खेमका यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ढिल्लन हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. हरयाणा सरकारने मात्र खेमका यांचे असे कुठलेही पत्र अजून मिळाले नसल्याचे सांगितले. जाहीरपणे आपली अवहेलना करण्यापेक्षा न विकल्या गेलेल्या बियाणांबाबत आपल्याला आरोपपत्रापूर्वीच स्पष्टीकरणाची संधी द्यायला हवी होती असे खेमका यांनी सांगितले. शहर व नियोजन विभागाचे महासंचालक टी. सी. गुप्ता, रोशनलाल, मुख्यमंत्री हुडा व त्यांचे सचिव एस. एस. ढिल्लन यांनी दुसरे आरोपपत्र दाखल करण्याचा कट रचला आहे असेही खेमका यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vadra case behind seeds chargesheet khemka to chief secy

ताज्या बातम्या