जम्मू काश्मीर मधील कटरा येथील वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजला देण्यात आलेली MBBS अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने MBBS चा अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली होती, ती आता आयोगाने रद्द केली आहे. MBBS साठी मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रवेश जास्त झाल्याने श्री माता वैष्णो देवी संघर्ष समितीने आंदोलन केले होते. या आंदोलनाचीच दखल घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Coucil) सर्वेक्षण केले व दिलेली परवानगी रद्द केली असे हिंदू संघटनेने म्हटले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या सुविधांची कमतरता असल्याचे म्हणत MBBS अभ्यासक्रमाची परवानगी रद्द केली. सर्वेक्षणात त्रुटी आढळल्याचे NMCने म्हटले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्वेक्षण केल्यानंतर वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजला २०२५-२६ या वर्षासाठी MBBS अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली होती.
५० पैकी ४४ जागांवर मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रवेश
कॉलेजमध्ये MBBS साठी एकूण ५० जागा आहेत. त्यापैकी ४४ जागांवर मुस्लिम विद्यार्थ्यांना NEET परीक्षेतील मेरिटनुसार प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर हिंदू संघटनांनी आंदोलन केले. देशभरातून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या देणगीतून कॉलेज चालते, असे आंदोलकांचे म्हणणे होते. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विरोध करण्यात आला होता. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने होणार विरोध लक्षात घेऊन पुन्हा एकदा सर्वेक्षण केले. त्यात कॉलेजमध्ये MBBS चा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याचे म्हटले आहे. कॉलेजमध्ये MBBS च्या अभ्यासक्रमासाठी संबंधित नियमांबाबत त्रुटी आढळल्याने आयोगाने दिलेली परवानगी रद्द केली आहे.
“कॉलेजमध्ये त्रुटी नाहीत”
दरम्यान, वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली. कॉलेजचे अधिकारी म्हणाले, कॉलेजमधील पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता नाही. पन्नास टक्के अधिकारी-कर्मचारी हिवाळ्याच्या सुट्टीवर गेले होते. नेमकं त्याचवेळी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या टीमने फक्त १५ मिनिटे आधी आम्हाला सर्वेक्षणसाठी येत असल्याचे कळवले होते. त्यानंतर आम्ही सुट्टीवर असलेल्यांना फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपाने NMC च्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार ?
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजची MBBS साठी दिलेली परवानगी रद्द केली. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता, त्यांना आता जम्मू- काश्मीरमधील इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल, असे NMC ने म्हटले आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला कोणत्या त्रुटी आढळल्या?
वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी ५० टक्क्यांपेक्षा कमी रूग्ण येतात. फक्त ४५ टक्के बेड रूग्णालयात आहेत. ३९ टक्के प्राध्यापकांची कमतरता, ६५ टक्के ट्युटर, निवासी प्राध्यापकांची कमतरता, ICU शी संबंधित नियमांची अपुर्तता, काही विभागांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल आणि रिसर्च लॅब नाहीत. MBBS अभ्यासाची फक्त ५० टक्के पुस्तके लायब्ररीत उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शिकवले जाईल, त्या हॉलमध्ये देखील सुविधांची कमतरता आहे, असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात आढळल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
