scorecardresearch

लंडनच्या भारतीय दूतावासात खलिस्तानवाद्यांकडून विध्वंस एकाला अटक; सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची ब्रिटनची ग्वाही

लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तान समर्थकांनी केलेल्या विध्वंसाच्या संबंधात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ब्रिटन गांभीर्याने घेईल, असे उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Khalistan protest
(लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर रविवारी जमलेले खलिस्तान समर्थक.)(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, लंडन

लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तान समर्थकांनी केलेल्या विध्वंसाच्या संबंधात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ब्रिटन गांभीर्याने घेईल, असे उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.स्वतंत्र खलिस्तानी झेंडे फडकावणाऱ्या आणि खलिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्या फुटीरतावाद्यांनी रविवारी भारतीय उच्चायुक्तालयावर फडकत असलेला तिरंगा राष्ट्रध्वज काढून टाकला होता. या हिंसक उपद्रवाशी संबंधित एका व्यक्तीला पोलिसांनी घटनेनंतर अटक केली.

‘प्रयत्न करण्यात आलेला, पण अयशस्वी ठरलेला’ हा हल्ला हाणून पाडण्यात आला असून, आता आणखी मोठा तिरंगा झेंडा इंडिया हाऊसच्या दर्शनी भागात फडकत असल्याचे उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.या घटनेत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचाराची गरज पडली नाही. हिंसक उपद्रवाच्या संशयावरून एकाला अटक करण्यात आल्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे महानगर पोलिसांनी सांगितले.या परिसरात जादा सुरक्षा तैनात करण्यात आली आहे काय असे विचारले असता, आपण ‘सुरक्षाविषयक मुद्दय़ांवर’ चर्चा करणार नाही असे त्यांनी सांगितले.

‘उच्चायुक्तालयाच्या व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अखंडतेविरुद्धची ही पूर्णपणे अमान्य होणारी कृती आहे. ब्रिटिश सरकार भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा नेहमीच गाभीर्याने घेईल’, असे ट्वीट परराष्ट्र कार्यालयमंत्री तारिक अहमद यांनी केले. अमेरिकेतही भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला
वॉशिंग्टन : खलिस्तानवादी निदर्शकांच्या एका गटाने रविवारी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून त्याचे नुकसान केले. भारतीय- अमेरिकी लोकांनी या घटनेचा जोरदार निषेध केला असून, या प्रकारासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘लंडन व सॅन फ्रान्सिस्को या दोन्ही ठिकाणी काही मोजक्या कट्टरवादी फुटीरतावाद्यांनी भारताच्या दूतावासांवर हल्ला केला. या घटनांत कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे’, असे फाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज (एफआयआयडीएस)ने म्हटले आहे.

खलिस्तान समर्थक घोषणा देत निदर्शकांनी शहर पोलिसांनी उभारलेले अडथळे तोडले आणि वाणिज्य दूतावासाच्या परिसरात दोन तथाकथित खलिस्तानी झेंडे उभारले. दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांनी तत्काळ हे झेंडे हटवले. यानंतर लगेचच, संतप्त निदर्शकांच्या एका गटाने दूतावासाच्या परिसरात शिरून हातातील लोखंडी कांबींनी दरवाजे व खिडक्यांवर प्रहार करण्यास सुरुवात केली.
सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी या घटनेवर तत्काळ काही प्रतिक्रिया दिली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 03:30 IST

संबंधित बातम्या