Insect found in egg biryani served in Vande Bharat : भारतीय रेल्वेने प्रवास करताना एका प्रवाशाला ‘एग बिर्याणी’मध्ये कीड लागलेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या ‘X’वर प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये संतप्त प्रवासी कॅटरिंग कर्मचाऱ्याला अन्नाच्या दर्जाबद्दल जाब विचारताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये प्रवासी म्हणतोय, “तुम्ही अन्न वाढताय की काय? तुम्ही भारतीय रेल्वेची थट्टा लावली आहे. मी हे खावं का? संपूर्ण एसी कोचला तुम्ही असेच जेवण देताय का? जर कोणी हे खाल्ले असते तर काय झाले असते? तुम्ही रोज असेच जेवण देता का?” यावर कॅटरिंग कर्मचारी उत्तर देतो, “काही हरकत नाही. हे आमच्याकडे बनत नाही, बाहेरून येते. तुम्हाला दुसरे जेवण मिळेल, काळजी का करता.”
@ChapraZila नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “IRCTC चा मोठा निष्काळजीपणा! रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका पत्रकाराला किड असलेले अन्न देण्यात आले. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार?”
या व्हिडिओची दखल घेत IRCTC ने म्हटले आहे की, “संबंधित सेवा पुरवठादारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सर्वंकष स्वच्छता आणि कीटक नियंत्रणासाठी (Pest Control) किचन युनिट सील करण्यात आले आहे. पुढील सुधारणात्मक कारवाईसाठी या प्रकरणाची सविस्तर चौकशीही केली जात आहे.”
याच महिन्याच्या सुरुवातीला, अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधील एका प्रवाशालाही जेवणात झुरळ आढळल्याने धक्का बसला होता. या प्रवाशाने ‘X’वर माहिती दिली होती की, त्यांच्या कोचमध्ये अशा किमान दोन घटना घडल्या, ज्यामुळे सर्वांनी जेवण थांबवले.
आयआरसीटीसीकडून कठोर कारवाई
या घटनेनंतर IRCTC ने सेवा पुरवठादाराला १० लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला असून कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली आहे, तसेच संबंधित किचन सील केले असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
