नागपूर : प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि अन्नाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय रेल्वेने कठोर भूमिका घेतली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत आलेल्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई करत इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) वर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय संबंधित अन्नपुरवठा करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीवर ५० लाखांचा दंड लावून तिचा करारही तत्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे रेल्वेतील केटरिंग व्यवस्थेवर अधिक जबाबदारी आणि नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारीनंतर तात्काळ कारवाई
१५ मार्च २०२६ रोजी गाडी क्रमांक २१८९६ (पटना–टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस) मध्ये प्रवाशाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार नोंदवली होती. ही तक्रार गंभीर मानून रेल्वे प्रशासनाने तत्काळ चौकशी सुरू केली. तपासात अनियमितता आढळल्यानंतर संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आयआरसीटीसीवर दंड, कंपनीवर कठोर निर्णय
या प्रकरणात आयआरसीटीसीवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अन्न पुरवणाऱ्या संबंधित सेवा पुरवठादार कंपनीवर ५० लाख रुपयांचा दंड लावण्यात आला. केवळ दंडावरच न थांबता रेल्वेने त्या कंपनीचा करार रद्द करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे भविष्यातील सेवा व्यवस्थेत बदल होणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
प्रवाशांची सुरक्षा आणि अन्नाची गुणवत्ता हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारींवर तातडीने आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दररोज लाखो प्रवाशांना अन्नसेवा
भारतीय रेल्वे आयआरसीटीसीच्या माध्यमातून दररोज सुमारे १५ लाख प्रवाशांना अन्न पुरवते. ही सेवा जगातील सर्वात मोठ्या ऑनबोर्ड खाद्य व्यवस्थांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या व्यवस्थेत गुणवत्ता राखणे अत्यंत महत्त्वाचे असून, अशा कारवायांमुळे प्रणाली अधिक पारदर्शक आणि जबाबदार होण्याची अपेक्षा आहे.
