Vande Bharat Express accident Bihar: रेल्वे ट्रॅकजवळ तंबाखू थुंकण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा भरधाव एक्सप्रेस धडकल्याने मृत्यू झाला आहे. बिहारमधील पूर्व मध्य रेल्वेच्या (ECR) दानापूर विभागांतर्गत येणाऱ्या ‘बाद’ रेल्वे स्थानकावर मंगळवारी (२४ मार्च) ही घटना घडली. पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
तंबाखू थुंकण्यासाठी गेला अन्…
दानापूरच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर ही घटना घडली. तंबाखू थुंकण्यासाठी हा व्यक्ती रुळांच्या अगदी जवळ गेला होता. यावेळी भरधाव वेगात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची धडक व्यक्तीला बसली. यामुळे हा व्यक्ती फलाटावर जोरात कोसळला व त्याला गंभीर जखम झाली.
रुग्णालयात मृत घोषित
दुर्घटना उघडकीस आल्यानंतर बाद रेल्वे स्थानकावरील वरिष्ठ रेल्वे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्तीला बाद रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे फलाटावर सावध राहण्याचे आवाहन केले आहे. फलाटावर झुकू नये, विशेषत: एक्सप्रेस जात असताना रुळांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु नये असेही आवाहन केले आहे.
