पीटीआय, नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसला ‘वंदे मातरम’चा आदर करता येत नसेल तर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीवर मक्तेदारी दाखवणे थांबवावे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
गोव्यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ची सहाऐवजी दोन कडवी गायली गेली. त्यावरून टीका करताना काँग्रेस पक्ष मतपेढीच्या राजकारणासाठी स्वतःच्याच परंपरांचे पालन करत नसल्याचा दावा प्रसाद यांनी केला. “काँग्रेस पक्ष राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’च्या बाबतीत असे वर्तन करत असेल तर तुम्ही स्वातंत्र्य चळवळीवर मक्तेदारी दाखवणे थांबवावे हे अधिक योग्य,” असे प्रसाद म्हणाले. ‘वंदे मातरम’ हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे गीत होते आणि १९३०च्या दशकात मुस्लीम लीगच्या दबावामुळे काँग्रेसने वंदे मातरमची केवळ दोन कडवी गाण्याचा निर्णय घेतला, असा आरोप प्रसाद यांनी केला.
काँग्रेस समितीचा १९३७चा निर्णय
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आचार्य नरेंद्र देव यांच्या समितीने शिफारस केल्यानंतर, काँग्रेसने १९३७मध्ये ‘वंदे मातरम्’ची पहिली दोन कडवी राखून त्याची राष्ट्रीय गीत म्हणून निवड केली होती.
