‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् यांच्या क्रमावरून नवा वाद उफाळून आला आहे. तमिळनाडूच्या परंपरेनुसार ‘तमिळ थाई वाझ्थू’ (तमिळ गीत) प्रथम गायले जाते, मात्र या सोहळ्यात त्याला तिसरे स्थान मिळाल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. यावर स्पष्टीकरण देताना टीव्हीकेने थेट राजभवनाकडे बोट दाखवले आहे.

नेमका वाद काय?

नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यात, तमिळ गीताऐवजी ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या गीताला प्राधान्य देण्यात आले. तमिळनाडूमध्ये कोणत्याही शासकीय कार्यक्रमाची सुरुवात तमिळ गीताने करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. मात्र, या सोहळ्यात ‘तमिळ थाई वाझ्थू’ तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेल्याने मित्रपक्षांसह विरोधकांनीही जोसेफ विजय यांच्यावर टीकेची झोड उठवली.

राज्यपालांच्या निर्देशांचा दाखला

या वादावर पडदा टाकण्यासाठी टीव्हीकेचे मंत्री आधव अर्जुन यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “तमिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. राज्यपालांच्या कार्यालयातून मिळालेल्या विशिष्ट सूचनांनुसारच हा क्रम ठरवण्यात आला होता. केंद्र सरकारच्या नवीन परिपत्रकानुसार काम करणे ही राज्यपालांची जबाबदारी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले.”

अर्जुन यांनी पुढे स्पष्ट केले की, ही नवीन पद्धत तमिळनाडूच्या संस्कृतीला आणि परंपरेला साजेशी नाही. केवळ अपरिहार्य परिस्थितीमुळे तमिळ गीत तिसऱ्या क्रमांकावर गायले गेले, मात्र भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही आणि तमिळ अस्मितेचा सन्मान राखला जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

मित्रपक्ष आणि विरोधक आक्रमक

या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. टीव्हीकेचे मित्रपक्ष असलेल्या सीपीआय आणि व्हीसीकेने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सीपीआय पक्षाचे राज्य सचिव एम. वीरपांडियन यांनी या घटनेचा निषेध केला असून सरकारने याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. व्हीसीके पक्षाचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी याला ‘धक्कादायक’ म्हटले आहे. ही केवळ मानवी चूक असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी विजय यांच्याकडून जाहीर स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. तर पीएमके पक्षाचे डॉ. एस. रामदास यांनीही राज्य सरकारने तामिळ गीताचा सन्मान राखणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

तमिळनाडूच्या राजकारणात ‘तमिळ अस्मिता’ हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. सी. जोसेफ विजय यांच्या पक्षाने राज्यपालांवर जबाबदारी ढकलून स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी आगामी काळात या मुद्द्यावरून ‘केंद्र विरुद्ध राज्य’ आणि ‘तमिळ विरुद्ध हिंदी/संस्कृत’ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.