पीटीआय, नवी दिल्ली
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचा अपमान हा फौजदारी गुन्हा ठरवण्याची तरतूद असलेले राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६ बुधवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात गेला आठवडाभर सुरू असलेली कामकाजाची कोंडीही फुटली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी विधेयकावर चर्चेला परवानगी दिल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करून ‘वंदे मातरम’चा अपमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केला. ‘वंदे मातरम’ला विरोध करणे म्हणजे ‘भारत तेरे टुकडे होंगे गँग’चे मनोधैर्य उंचावण्याचा प्रकार आहे, असा दावाही त्यांनी केला. काँग्रेस या विधेयकाला विरोध का करत आहे, याबद्दल राय यांनी आश्चर्य व्यक्त केले.
राय म्हणाले, “बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७५मध्ये ‘वंदे मातरम’ची रचना केली. हे गीत एक दिवस एखाद्या मंत्रासारखे प्रत्येक भारतीयाच्या ओठी असेल असे ते तेव्हा म्हणाले होते. दुर्दैवाने १९३७मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम’ हे केवळ दोन कडव्यांपुरते मर्यादित केले.” अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे अखेरचे शब्द ‘वंदे मातरम’ होते, याची आठवणही राय यांनी करून दिली.
‘वंदे मातरम’ विधेयक हे कोणतेही साधारण विधेयक नाही तर ते देशाचे आत्मा, राष्ट्रीय जागरूकता आणि सांस्कृतिक वारसा यांचे प्रतिनिधित्व करते, तसेच आपल्याला स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून देते. काही लोक किंवा विशेषतः काँग्रेस ‘वंदे मातरम’च्या विरोधात का आहे ते मला माहीत नाही. – नित्यानंद राय, केंद्रीय गृह राज्यमंत्री
विधेयकातील तरतुदी
प्रस्तावित विधेयकानुसार, ‘वंदे मातरम’चा जाणीवपूर्वक अपमान करणे, त्याचे गायन रोखणे किंवा गीत सुरू असताना जाणूनबुजून व्यत्यय आणणे हा गुन्हा मानला जाईल. अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्याला तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय गीताचा जाणीवपूर्वक अपमान करणे, ‘वंदे मातरम’चे गायन मुद्दाम रोखणे. गीत सुरू असताना जाणूनबुजून गोंधळ किंवा व्यत्यय निर्माण करणे या तीन कृती दंडनीय ठरतील. या विधेयकानुसार, एखादी व्यक्ती राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित गुन्ह्यात दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषी ठरल्यास, तिला किमान एक वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.
