नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या गायनावरून सुरू झालेल्या नव्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस कार्यकारिणी समितीने पक्षाची १९३७मधील भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’च्या केवळ पहिल्या दोन कडव्यांचे गायन केले जाईल, असे निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी दिली.
राष्ट्रीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवीच गायली जावीत, असा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने १९३७मध्ये घेतला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यामुळे या निर्णयाचे पालन केले जाईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे मुख्यालय ‘इंदिरा भवन’मध्ये स्वातंत्र्यदिनीच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ची दोन कडवी झाल्यानंतर हे गीत थांबवले गेल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर झालेल्या राजकीय वादावर काँग्रेसने सर्व कडवी गायली गेल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, गोव्यातील कार्यक्रमामध्ये या राष्ट्रीय गीताची फक्त दोन कडवीच गायली गेली. त्यानंतरमात्र, काँग्रेसने ‘वंदे मातरम’ या गीतासंदर्भात भूमिका जाहीर करताना, पहिली दोन कडवीच गायली जातील, असे स्पष्ट केले. या वादाची दखल घेत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केली गेली व १९३७ च्या कार्यकारिणीतील निर्णय कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रमेश यांनी बुधवारी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
हल्द्वानीतील कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणावरही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. हा प्रकार संविधान, मानवता आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत पंतप्रधानांनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप-संघाशी संबंधित संस्थांचाही सहभाग असल्याने केवळ काही व्यक्तींना जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, असे रमेश म्हणाले. म्हटले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्य हल्द्वानीतील कार्यक्रमानंतर भाजपशी संबंधित लोकांनी शुद्धीकरण केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
‘छात्रों की गूंज’चा विस्तार
‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी-केंद्रित मोहिमेचा विस्तार केला जाईल. देशातील ८०० शहरे आणि गावांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. त्यापैकी काही कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. शिक्षण आणि परीक्षाव्यवस्थेतील सुधारणांबाबत काँग्रेसच्या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहवाल तयार करून महिनाभरात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीविरोधात काँग्रेस आक्रमक होण्याचे संकेत देण्यात आले. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मुद्द्यावर काँग्रेस देशभर मोहीम राबवणार आहे. अरुणाचल प्रदेशातील कथित चिनी घुसखोरीवरूनही बैठकीत चिंता व्यक्त केली गेली. चीन आणि अमेरिकेच्या संदर्भात मोदी सरकार आणि पंतप्रधानांकडून वारंवार ‘माघार’ घेतली जात असल्याचा आरोप रमेश यांनी केला.
लोकसभेचे संख्याबळ २५ वर्षे कायम ठेवण्याची मागणी
लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला काँग्रेसने विरोध केला आहे. लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांची संख्या पुढील २५ वर्षे कायम ठेवावी, प्रत्येक राज्याच्या जागांचा वाटाही बदलू नये, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच, सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षणाची अंमलबजावणी सध्याच्या ५४३ सदस्यांच्या लोकसभेतच करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
