Varanasi Ganga Iftar Party Arrest: गंगेत बोटीवर इफ्तार पार्टी करुन, नदीत चिकन बिर्याणीची हाडं व कचरा टाकल्याच्या आरोपावरुन १४ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची दखल घेत प्रार्थनास्थळाचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मंगळवारी चौदा मुस्लिम तरुणांना पोलिसांनी अटक केली.

भाजापा युवा मोर्चाकडून तक्रार

गंगेत बोटीवर काही मुस्लिम तरुण इफ्तार पार्टी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर भाजपा युवा मोर्चाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. युवा मोर्चाचे प्रमुख रजत जैसवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, “इफ्तार पार्टीच्या नावाखाली मुस्लिम तरुण बिंदू माधव धरडा मंदिरासमोरून नौकाविहार करत मांसाहार करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मंदिराचा उल्लेख ते ‘आलमगीर मशीद’ असा करत होते. नंतर त्यांनी हाडं नदीत फेकून दिली,” जैसवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पुरावा म्हणून व्हायरल व्हिडीओ सादर

“सनातन धर्मीयांची गंगा नदीवर अढळ आणि दृढ श्रद्धा आहे. हजारो भाविक दररोज गंगाजल वापरून विधी आणि प्रार्थना करण्यासाठी काशीला भेट देतात. जिहादी मानसिकतेने केलेल्या या कृत्याविरोधात आम्ही पुरावा म्हणून व्हिडिओ क्लिप्ससह तक्रार दाखल केली आहे,” असे  जैसवाल टाईम्सला माहिती देताना म्हणाले.

गुन्हा दाखल

कोतवाली पोलिस ठाण्याचे एसीपी विजय प्रताप सिंह यांनी टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, जैसवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८ (धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाची विटंबना करणे), २९९ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर आणि द्वेषपूर्ण कृत्य करणे), १९६(१)(ब) (धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २७० (सार्वजनिक उपद्रव), २२३(ब) (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करणे) आणि जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९७४ च्या कलम २४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ जणांना अटक

पोलिसांनी व्हायरल व्हिडिओंच्या मदतीने १४ आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. मोहम्मद अव्वल, अमजद अली, मोहम्मद समीर, मोहम्मद अहमद उर्फ ​​रझा, नूर इस्माईल, मोहम्मद फैजान, मोहम्मद अहमद, मोहम्मद तहसीम, महफूज आलम, मोहम्मद तौसिफ अहमद, अमीर कैफी, दान आफ्री, नेहल कैफी, मोहम्मद तौसिफ अहमद, मोहम्मद मदनपुरा असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.