Varanasi Ganga Iftar Extortion Case: गंगा नदीत इफ्तार पार्टी आयोजित केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. १४ मुस्लिम तरुणांनी नदीत बोटीवर इफ्तार पार्टी आयोजित करुन चिकन बिर्याणीचे खरकटं नदीत फेकल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी आता वारणसी पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल
“बोटवरील कर्मचाऱ्यांने दिलेल्या माहितीच्या आधारे आता त्या १४ जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देऊन बोटीत बसल्याचा आरोप करण्यात आला आहे”, अशी माहिती वाराणसीचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय प्रताप सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली. ६५ वर्षीय काशी सहानी यांच्या मालकीची ही मोटरबोट असून, पोलिसांनी त्यांचाही जबाब नोंदवला आहे.
मोटरबोट मालक काय म्हणाला?
मोटरबोट मालक काशी सहानी यांचा मुलगा अनिल सहानी आणि त्यांचा नातेवाईक रंजन सहानी यांच्या जबाबावरुन खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सिंग यांनी दिली. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना काशी सहानी यांनी घटनेबाबत माहिती दिली. स्थानिक नाजू यादव यांनी बोट भाड्याने घेतली होती. यादव बोटीतून फेरी मारुन ४५ मिनिट लवकर पोहोचले आणि त्यांनी चाव्या माघारी दिल्या. पण, बोटीत काय घडले याची माहिती त्यांना नसल्याचे काशी यांनी सांगितले.
जामीनासाठी अर्ज
काशी यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, बोट १,८०० रुपयांचे भाडे निश्चित करुन देण्यात आली होती. सुरुवातीला डिझेल कमी असल्याने त्याची सोय करुन त्यांना बोटचा ताबा देण्यात आला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांनी जामीनासाठी अर्ज केला असून, कोर्टासमोर तो प्रलंबित आहे. याप्रकरणी एक व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते.
यापूर्वी गुन्हा दाखल
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रजत जैसवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच, चौकशीअंती १४ जणांना अटक केली होती. सुरुवातीला या प्रकरणात जैसवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८ (धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाची विटंबना करणे), २९९ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर आणि द्वेषपूर्ण कृत्य करणे), १९६(१)(ब) (धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २७० (सार्वजनिक उपद्रव), २२३(ब) (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करणे) आणि जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९७४ च्या कलम २४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
