Varanasi student killed in school: वाराणसीमध्ये उदय प्रताप महाविद्यालयात शुक्रवारी एका २३ वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला असून, पीडिताच्या वडिलांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे आणि आरोपीचा ‘एन्काऊंटर’ करण्याची मागणी केली आहे.

घटना कशी घडली?

उदय प्रताप स्वायत्त महाविद्यालयातील बी.एस्सी. चौथ्या सेमिस्टरचा विद्यार्थी सूर्य प्रताप सिंग (वय २३, गाजीपूर जिल्ह्यातील दुबैथा येथील रहिवासी) याची सकाळी सुमारे ११ वाजता सामाजिक शास्त्र विभागाच्या इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सहविद्यार्थी मनजीत चौहान याने जवळून गोळीबार केला. सूर्य प्रताप याच्या डोक्‍यावर, छातीवर आणि इतर भागात चार ते आठ गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर आरोपी पहिल्या मजल्याकडे पळाला, संरक्षक भिंत ओलांडली आणि जवळच्याच कचराकुंडीत पिस्तूल टाकून फरार झाला. पोलिसांनी नंतर हे शस्त्र जप्त केले.

पीडिताच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

सुरुवातीला पीडिताला मालदहिया येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, नंतर बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन गृहात पोहोचल्यानंतर सूर्य प्रताप यांचे वडील ऋषीदेव सिंग यांनी ढसाढसा रडत म्हणाले की, “जोपर्यंत आरोपीला संपवले जात नाही, तोपर्यंत आम्ही मुलाच्या अंत्यसंस्काराला तयार नाही.” पोलिसांशी तणावपूर्ण चर्चेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या शिवपूर येथील निवासस्थानी नेण्यात आला. सूर्य प्रताप हे हुशार आणि लोकप्रिय विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आई-वडील दोघेही अतुलानंद शाळेत कर्मचारी आहेत.

कॅम्पसमध्ये उसळला हिंसाचार

या हत्येनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले, मालमत्तेची तोडफोड केली आणि अनेक वाहनांचे नुकसान केले. किमान तीन शिक्षकांवर हल्ला झाला, त्यापैकी एकाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना पोलीस संरक्षणाखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले. तणाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले. अडकलेल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले.

पोलिसांची कारवाई

वाराणसीचे पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, हा गोळीबार दोन विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक वादातून झाला. “प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, हा परस्पर वैरभाव आणि जुना वाद याचा परिणाम आहे,” असे आयुक्त म्हणाले. मुख्य आरोपी मनजीत चौहान आणि त्याचा साथीदार अनुज ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनजीत चौहानला नंतर अटक करण्यात आली असून, तो चांदमारी येथील रहिवासी आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि फरार असलेल्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे महाविद्यालयातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, विशेषतः कॅम्पसमध्ये शस्त्र कसे आणले गेले याबाबत. विद्यार्थ्यांनी प्रिंसिपलच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. पोलिसांनी परिसर नियंत्रणात आणला असून, तपास सुरू आहे.