भाजपचे खासदार वरुण गांधी यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांना उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचारात सहभागी होता येणार नाही. वरुण गांधी यांनी इंदोरमध्ये मंगळवारी केलेल्या भाषणातून मोदी सरकारला घरचा आहेर दिला होता.

भाजपचे सुलतानपूरचे खासदार असलेले वरुण गांधी यांना निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नव्हते. यानंतर वरुण गांधी यांचा समावेश तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले. मात्र या यादीत त्यांचे नाव शेवटचे होते. विशेष म्हणजे या संपूर्ण कालावधीत वरुण गांधी कुठेही प्रचार करताना दिसले नाहीत. वरुण गांधी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या सुलतानपूरमध्येही भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आले नाहीत.

आता उत्तर प्रदेशात सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात होते आहे. यासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. यातून वरुण गांधी यांचे नाव वगळण्यात आले आहे. वरुण गांधी यांच्या जागी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे.

२००९ मध्ये वरुण गांधी लोकसभा पिलीभीत मतदारसंघातून ५० टक्के मते मिळवून विजयी झाले होते. तर २०१४ मध्ये सुलतानपूरमधून निवडणूक लढवताना वरुण गांधी यांना ४३ टक्के मत मिळाली होती. वरुण गांधी त्यांच्या मतदारसंघातील तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.