पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.

पोप यांच्याशी करोना विषाणू साथ आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने यांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे ट्वीट मोदी यांनी भेटीनंतर केले. पोप यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. आमची ही भेट अतिशय सौहार्दपूर्ण होती. मी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी आणि पोप यांच्यातील ही बैठक २० मिनिटांची असेल, असे निश्चित करण्यात आले होते, परंतु दोन्ही नेत्यांनी विविध जागतिक समस्यांवर सुमारे एक तास चर्चा केली. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या, गरिबी, करोना साथ या विषयांवर त्यांनी चर्चा केली. मोदी यांनी पोप यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने योजलेल्या उपाययोजनांची, त्याचबरोबर १०० कोटी लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी ‘जी२०’ परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही आहेत. मोदी ग्लासगो येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या हवामान परिषदेसाठीही उपस्थित राहणार आहेत.   

पोप फ्रान्सिस यांची २०१३ मध्ये पोप म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची भेट घेणारे मोदी हे पहिले राष्ट्रप्रमुख आहेत, तर गेल्या दोन दशकांनंतर पोप यांची भेट घेणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. जून २००० मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हॅटिकन सिटी येथे पोप जॉन पॉल दुसरे यांची भेट घेतली होती.

पोप हे रोमन कॅथलिक या जगातील सर्वात मोठ्या धर्मपंथाचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. मोदी हे पोप यांची भेट घेणारे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. यापूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आय. के. गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी ते पंतप्रधानपदी असताना पोप यांची व्हॅटिकन येथे भेट घेतली होती.

भारतात अल्पसंख्य ख्रिस्ती समुदायाची छळवणूक आणि चर्चवर हल्ले होत असल्याच्या तक्रारी पुढे असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पोप यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतात २०११च्या जनगणनेनुसार हिंदू ७९.८ टक्के, मुस्लीम १४.२ टक्के, तर ख्रिस्तीधर्मीयांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.३ टक्के आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी२० देशांच्या परिषदेसाठी रोममध्ये दाखल झाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य या विषयावरील या परिषदेच्या पहिल्या सत्रात ते भाग घेणार आहेत. परिषदस्थळी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी मोदी यांचे स्वागत केले.

पोप फ्रान्सिस यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. करोना साथ आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने यांसह विविध विषयांवर आम्ही चर्चा केली.  त्यांना मी भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान