लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दहा दिवसांच्या चर्चांच्या अनेक फेर्‍यांनंतर गुरुवारी केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस हायकमांडने व्ही. डी. सतीशन यांची निवड केली. काँग्रेसचे संघटना महासचिव व खासदार के. सी. वेणुगोपाल यांना बहुतांश आमदारांचा पाठिंबा असूनही सतीशन यांनी बाजी मारली. तिसरे स्पर्धक, अनुभवी नेते रमेश चेन्नीथला यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले.

केरळमध्ये काँग्रेसच्या ‘यूडीएफ’ आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडने मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा असा ठराव संमत केला. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत विरोधी पक्षनेते सतीशन, राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू वेणुगोपाल आणि केरळमधील जुने-जाणते रमेश चेन्नीथला यांची नावे होती. राहुल गांधींचा कल वेणुगोपाल यांच्याकडे असल्याचे सांगितले जात होते. मात्र केंद्रीय नेतृत्वामध्ये एकमत होत नव्हते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच, या तीनही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या. तरीही निर्णय न झाल्यामुळे केरळमध्ये काँग्रेसच्या हायकमांडबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सतीशन लोकप्रिय असल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जावी असा दबाव काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर येऊ लागला होता. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याविरोधात फलक लावले गेले. आता वायनाड विसरा, असा इशाराही देण्यात आला. लोकांचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहून अखेर काँग्रेस हायकमांडने सतीशन यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याचे मानले जाते.

सतीशन यांची निवड करण्याआधी निरीक्षक अजय माकन व मुकुल वासनिक यांनी केरळ काँग्रेसचे आजी-माजी खासदार, आमदार, इतर नेत्यांची मते जाणून घेतल्याच सांगितले जाते. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी गुरुवारी के.सी. वेणुगोपाल यांची समजूत काढली व त्यांना मुख्यमंत्रीपदापासून परावृत्त केले. चेन्नीथला यांच्याशीही केरळमध्ये राहुल गांधींनी संपर्क साधून निर्णय कळवला. सतीशन यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर हायकमांडचा निर्णय मानू, असे पत्रकारांना सांगत वेणुगोपाल यांनी सतीशन यांचे अभिनंदन केले.

कार्यकर्त्यांच्या पसंतीला प्राधान्य

’काँग्रेसच्या बहुतांश आमदारांचा वेणुगोपाल यांना पाठिंबा असला तरी यावेळी काँग्रेस हायकमांडने कार्यकर्त्यांच्या पसंतीला प्राधान्य दिले. वेणुगोपाल लोकसभेचे खासदार असून त्यांना केरळमध्ये पाठवले असते तर एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदाराला राजीनामा द्यायला लावून तिथून वेणुगोपाल यांना निवडून आणावे लागले असते.

’शिवाय अळप्पुळा लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक घ्यावी लागली असती. सतीशन यांनी, वेणुगोपाल व चेन्नीथला यांनी विश्वासात घेऊन काम करू, अशी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. चेन्नीथला यांनी मात्र अजून प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.