Kerala CM Oath Ceremony : केरळ विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर देखील जवळपास दहा दिवस केरळच्या मुख्यमंत्री पदावरून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. केरळचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत दहा दिवस चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री निवडीवरुन काँग्रेसच्या सुरू असलेल्या बैठकांमधून ठोस निर्णय होत नव्हता. कारण के.सी. वेणूगोपाल, रमेश चेन्नीथला आणि व्ही.डी.सतीशन यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर अखेर काँग्रेस नेतृत्वाने व्ही.डी.सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

त्यामुळे केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी.सतीशन यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला. आता केरळचे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन हे सोमवारी (१८ मे) शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर २१ मंत्री देखील मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

व्ही.डी.सतीशन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात नेमकं कोण-कोण असतील? त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री व्ही.डी.सतीशन यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील २१ सदस्य देखील मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश?

व्ही.डी.सतीशन यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या काही प्रमुख नेत्यांमध्ये रमेश चेन्नीथला, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख सनी जोसेफ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.मुरलीधरन यांचा समावेश असणार आहे. तसेच व्ही.डी.सतीशन यांनी अशीही घोषणा केली की, तिरुवंचूर राधाकृष्णन हे केरळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील आणि शानिमोल उस्मान या उपाध्यक्षा असतील.

केरळच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? वाचा यादी!

-व्ही.डी.सतीशन (मुख्यमंत्री)
-पीके कुन्हालीकुट्टी
-रमेश चेन्निथला
-सनी जोसेफ
-के मुरलीधरन
-मॉन्स जोसेफ
-शिबू बेबी जॉन
-अनूप जैकब
-सीपी जॉन
-एपी अनिल कुमार
-एन शमसुद्दीन
-पीसी विष्णुनाथ
-रोजी एम जॉन
-बिंदू कृष्णा
-एम लिजू
-के एम शाजी
-पी के बशीर
-अब्दुल गफूर
-सी टी सिद्दीक
-ओ जे जनीश
-केए तुलसी

काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक मंत्रिपद

केरळच्या UDF सरकारमध्ये काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक मंत्रिपदे असणार आहेत. यामध्ये काँग्रेसच्या व्ही.डी.सतीशन, रमेश चेन्नीथला, के. मुरलीधरन, सनी जोसेफ, बिंदू कृष्णा, ए.पी.अनिल कुमार, पी.सी.विष्णूनाथ, एम.लिजू, रोझी एम.जॉन, टी.सिद्दीकी, ओ.जे.जनीश आणि के.ए.तुलसी यांचा समावेश असणार आहे.

आययूएमएलकडे किती मंत्रिपद?

केरळच्या UDF सरकारमध्ये आययूएमएल (इंडियन युनियन मुस्लिम लीग) मधील पीके कुन्हालीकुट्टी, पीके बशीर, एन शमसुद्दीन, के एम शाजी, व्हीई अब्दुल गफूर यांचा मंत्रिमंडळात समावेश असेल. तसेच आरएसपीचे शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेस (जेकब) चे अनूप जेकब आणि सीएमपीचे सी.पी.जॉन यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

शपथविधी सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह आदी नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, सोनिया गांधी उपस्थित राहणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या बरोबरच काँग्रेसशासित राज्ये कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या बरोबरच तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, मुख्यमंत्री जोसेफ विजय हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? याबाबत अद्याप पुष्टी मिळालेली नाही. केरळ सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी सकाळी १० वाजता तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

Kerala CM Oath Ceremony

व्हीडी सतीशन कोण आहेत?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाल्यानंतरही केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नव्हता. काँग्रेस पक्षाने केरळमध्ये एका दशकानंतर सत्ता मिळवली. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी तीन प्रबळ दावेदार असल्यामुळे काँग्रेससमोर अडचण निर्माण झाली होती. अखेर काँग्रेसने मर्जीतल्या नेत्यांची मनधरणी करत ज्यांच्या नावाची मागणी जोरदारपणे झाली होती, अशा व्हीडी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

काँग्रेस नेते व्हीडी सतीशन यांनी २०२१ ते २०२६ या काळात केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं होतं. एर्नाकुलम जिल्ह्यातील परवूर विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. या जागेवर त्यांनी २००१ पासून अनेकदा विजय मिळवला आहे. व्हीडी सतीशन यांना काँग्रेस पक्षातून आणि यूडीएफमधील मित्रपक्ष केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) या मित्रपक्षांचाही पाठिंबा आहे. १९६४ साली जन्मलेल्या सतीशन यांनी विधी शाखेची पदवी मिळवल्या नंतर केरळ उच्च न्यायालयात वकिली केली. विद्यार्थीदेशत त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

केरळच्या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?

केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार काँग्रेसला १४० पैकी ६३ जागांवर विजय मिळाला आहे. त्यापाठोपाठ माकपसा २६, आययूएमएल पक्षाला २२ जागांवर विजय मिळाला. भाकप पक्षाला ८, केईसीला ७, आरएसपीला ३ तर इतर व अपक्ष मिळून ११ आमदार या निवडणुकीत निवडून आले.