नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदान्त समूहाची परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) चौकशी सुरू करत, कंपनीच्या दिल्ली, मुंबई आणि उदयपूरसह चार कार्यालयांवर छापे टाकले.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सुरू करण्यात आलेली ही कारवाई परकीय चलन नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. लंडनस्थित ‘वेदान्त रिसोर्सेस’ या मूळ कंपनीने २०२३ मध्ये भारतीय उपकंपनी ‘वेदान्त लिमिटेड’ला ब्रँड शुल्काचा काही भाग परत केल्याच्या व्यवहाराची ईडीकडून छाननी केली जात आहे. याशिवाय समूहाच्या काही अन्य आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ईडीची कारवाई झाल्याची पुष्टी वेदान्त समूहाने केली आहे. चौकशी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्यात येत असून सर्व माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, ४ मे रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने अनिल अग्रवाल यांच्या ‘वेदान्त लिमिटेड’ने दिवाळखोरीत गेलेल्या स्थावर मालमत्ता कंपनी ‘जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड’साठी (जेएएल) गौतम अदानी समूहाने लावलेल्या बोलीला दिलेले आव्हान फेटाळून लावले होते. ‘जेएएल’च्या मालमत्तेमध्ये भारतातील एकमेव ‘फॉम्र्युला वन सर्किट’चा समावेश आहे.
देशातील आघाडीची कंपनी
धातू, महत्त्वाची खनिजे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘वेदांता लिमिटेड’ ही देशातील आघाडीची कंपनी असून भारतासह आफ्रिका, पश्चिम आणि पूर्व आशियात तिचे व्यवसाय कार्यरत आहेत. अलीकडेच कंपनीच्या संचालक मंडळाने वेदांता समूहाच्या विभाजनाला मंजुरी दिली असून चार स्वतंत्र कंपन्या सूचिबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
समभागांत घसरण वेदान्त समूहावर ईडीचे छापे पडताच गुंतवणूकदारांनी वेदान्तच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. यामुळे कंपनीचे समभाग ४ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. बाजार बंद होताना ते १ टक्के घसरणीसह बंद झाले.
