Chhattisgarh Power Plant Blast today at Vedanta unit causes multiple fatalities and injuries : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका वीज प्रकल्पाच्या बॉयलर युनिटमध्ये झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत इतर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा स्फोट दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सिंघीतराई गावातील वेदांता लिमिटेडच्या वीज प्रकल्पातील बॉयलर ट्यूबमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. शक्ती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी सांगितले की, “काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचाव कार्य सुरू आहे.”
शक्ती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो यांनी नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या भीतीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान ठाकूर म्हणाले की अनेक कामगारांना वाचवण्यात आले आहे. “आम्ही प्रशासनाला त्यांचे बॉयलर ऑपरेशन बंद करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते थंड होईल आणि आम्हाला बचावकार्य पुढे चालू ठेवता येईल. तसेच आम्ही आमच्या मदतीसाठी जादा कुमक मागवली आहे.”
वेदांता लिमिटेड छत्तीसगड थर्मल पॉवर प्लांटने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला कळवताना खेद वाटतो की १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी आमच्या सिंघीतराई येथील प्लांटच्या युनिट १ बॉयलरमध्ये दुर्घटना घडली, ज्यामध्ये आमचे बिझनेस पार्टनर एनजीएसएलचे अधिकऱ्यांचा समावेश आहे.
आमची पहिली प्राथमिकता ही बाधित झालेल्या सर्वांना शक्य तितकी सर्वोत्तम वैद्यकीय मदत आणि उपचार मिळवून देणे ही आहे.आमच्याकडून जखमींना पूर्ण पाठिंबा दिला जात आहे आणि वैद्यकीय पथके तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे,” असेही निवेदनात म्हटले आहे.
