लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : अमेरिकेत कृष्णवर्णीय गुलाम म्हणून जन्मलेले शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, शिक्षणासाठी केलेली धडपड, निसर्गाची असणारी ओढ आणि त्याच ओढीतून कृषिक्षेत्रात त्यांनी घडवलेली क्रांती हा प्रवास वाचकांपर्यंत पोहोचवणारे आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिकवणारे पुस्तक म्हणजे ‘एक होता कार्व्हर’. ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाची पन्नासावी आवृत्ती शनिवारी ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर यांच्या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आली. यावेळी या छोटेखानी प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर, संपादक सदानंद बोरसे, ज्येष्ठ कलादिग्दर्शक विकास गायतोंडे, वीणा गवाणकर यांचे पती चंद्रकांत गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जवळपास ४५ वर्षांचा प्रवास पूर्ण केलेल्या या पुस्तकाच्या पन्नासाव्या आवृत्तीची जुनी ओळख आणि निर्सार्गाशी, मातीशी असणारे नाते कायम ठेवण्यात आले आहे. पुण्याचे चित्रकार राजू देशपांडे यांनी या आवृत्तीला नवे रूप दिले आहे. यामध्ये पहिल्यांदाच राजहंसचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच राजहंसचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरला लिहिलेले अनौपचारिक पत्र हे या नव्या आवृत्तीचे विशेष आकर्षण आहे.

माणूसमधील हस्तलिखितापासून सुरुवात

श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’ या दिवाळी अंकात वीणा गवाणकर यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरवर लिहिलेल्या हस्तलिखितापासून या पुस्तकाचा प्रवास सुरु झाला. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यासह दर्दी वाचकांनी केलेल्या लेखाच्या कौतुकानंतर ‘‘एक होता कार्व्हर’’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि १९८१ साली १५ रुपये किंमत असणारी पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने वाचकांनी गवाणकर यांना पाठवलेल्या पत्रांचे एक बुकलेट तयार करण्यात आले. तसेच २००१मध्ये दूरचित्रवाणीवर प्रकाशित करण्यात आलेले ‘एक होता कार्व्हर’ हे पहिले पुस्तक ठरले. विशेष म्हणजे, या यशानंतर लेखिका आणि प्रकाशकांनी रॉयल्टीमधील प्रत्येकी अडीच टक्के रक्कम सामाजिक संस्थांना दान करण्याचा एक नवा आदर्शही घालून दिला.

पन्नासावी आवृत्ती ही दुर्मीळ गोष्ट आहे. लेखिकेला स्वतः जाऊन ते पुस्तक देणे ही खास गोष्ट आहे. बरीच वर्षे मी लेखकांना काही न सांगता अचानक त्यांच्याकडे जाऊन त्यांना पुस्तके दिली आहेत. अशा पद्धतीने पुस्तक पाहिले की लेखकाला आपले मूल पाहिल्यासारखा आनंद होतो आणि तो आनंद मला घ्यावासा वाटतो. – दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन

आध्यात्मिक परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी किंवा तुकारामाच्या गाथेचं जे स्थान आहे. तेच स्थान वैज्ञानिक क्षेत्रात किंवा इतर अनेक क्षेत्रांमध्ये कार्व्हरने गेल्या तीन पिढ्यांना दिले आहे. – सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन

माझी कल्पना होती की हे पुस्तक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल. पण एप्रिल महिन्यातच ही आवृत्ती प्रकाशित झाली. हे मला सर्वार्थाने आनंदाचा धक्का आश्चर्याचा धक्का देणारे होते. – वीणा गवाणकर, लेखिका, ‘एक होता कार्व्हर’