काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आपल्या विविध विधानांवरून कायमच चर्चेत असतात. आता देखील त्यांचे एक असे विधान समोर आले आहे, ज्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. या वेळी दिग्विजय सिंह यांनी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलतान हिंदू, हिंदुत्व, गाय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबदद्ल विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. त्यांनी हे देखील लिहिले आहे की गाय असा प्राणी आहे की जो स्वत:च्या शेणात लोळण घेतो, ती आपली माता कशी काय असू शकते? गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, असं सावरकरांनी सांगितलं आहे” असं दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.

मागील काही दिवसांपासून हिंदू, हिंदुत्व व सावरकर या मुद्य्यांवरून भाजपा काँग्रेस नेत्यांची विविध विधानं समोर येत आहेत. अगदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील सातत्याने हिंदुत्वावरून बोलल्याचे दिसून आले आहे. आता दिग्विजय सिंह यांनी देखील या संदर्भात विधान केलं आहे. शिवाय, सावरकरांबद्दलही त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसत आहे.

“इथे असे देखील हिंदू आहेत जे गोमांस खातात आणि म्हणतात कुठे लिहिलं आहे गोमांस खाऊ नये आणि बहुतांश हिंदू जे आहे ते गोहत्येच्या विरोधात आहेत. स्वत: सावरकर, सावरकरांबद्दल भाजपाकडून बरच सांगितलं जातं, त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. स्वत: त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलं आहे की, हिंदू धर्मचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही आणि हे देखील लिहिलं आहे की, गाय असा प्राणी आहे की स्वत:च्या शेणात लोळण घेते, ती कशीकाय आपली माता होऊ शकते? आणि तिचं गोमांस खाण्यात काही चुकीच नाही, हे सावरकरांनी स्वत: म्हटलं आहे. ” असं दिग्विजय सिंह कार्यक्रमात म्हणाले आहेत.

तसेच, ही सर्व विधानं सावरकरांची असून यातील एकही वाक्य आपलं मत म्हणून आपण सांगत नसल्याचा दावाही यावेळी दिग्विजय सिंह यांनी केला. त्यामुळे आता आगामी काळातील उत्तर प्रदेश निवडणुकीत हिंदू, हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचं दिसत आहे.