कृष्णा पांचाळ , अमित उजागरे
पिंपरीत बारणेंचाच बोलबाला आहे, मात्र तरीही मी पार्थ पवारांना मतदान करणार असं मत एका स्थानिक भाजी विक्रेत्या आजीबाईंनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या बोलण्यात विरोधाभास वाटत असला तरी अजित पवारांनी पिंपरीत अनेक चांगली कामं केल्यानेच त्यांच्या मुलाला मतदान करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. विमल गवारे असं या भाजी विक्रेत्या आजीबाईंचे नाव आहे. लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना त्यांनी आपली भुमिका व्यक्त केली आहे. पिंपरीत लोकसभेसाठी २९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यानिमित्त या भागात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला असता अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाजूने भुमिका मांडली.
पार्थ पवारांचे कुटुंब हे शेतकऱ्याशी संबंधीत आहे. त्यांचे वडिल अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी आणि पिंपरी भागासाठी कामं केल्याने त्यांनाच आपण मतदान करणार असल्याचं या आजीबाईंनी म्हटलं आहे. तरीही आमचं मत त्यांच्याबाजूनं असलं तरी त्यांनीही आमच्याकडे लक्ष देणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कांदा-बटाट्याचे व्यवसायिक जयकुमार थिटे यांनी सांगितलं की, विद्यमान खासदारांचे पिंपरी विभागाकडे लक्ष नाही. आमच्या समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय. तर पिंपरी-चिंचवडचा विकास हा पवारांनीच केला आहे. त्यामुळे पार्थ पवार येथे निवडून येणं गरजेचं आहे आणि येथे शंभर टक्के पवारांचीच हवा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माथाडी कामगार शाहीर पांडुरंग ओव्हाळ म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या माथाडी कामगारांकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी जवळून बघणे गरजेचे आहे. कारण ते सर्वांचेच प्रतिनिधी आहेत. या भागात सध्या बारणेंपेक्षा पार्थ पवारांचीच हवा आहे.
नोटाबंदी आणि ऑनलाइन व्यवहारांचा किरकोळ भाजी विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. पूर्वी ८० टक्के बाजार होता तर तो आता २५ टक्केच राहिला आहे. नोटाबंदीमुळे ऑनलाईन व्यवहारांत वाढ झाली आहे. मात्र, त्याचा फटका आमच्यासारख्या किरकोळ भाजी विक्रेत्यांना बसला आहे. लोक आता भाजीही ऑनलाईन पेमेंटद्वारे खरेदी करीत असल्याने सामान्य भाजी व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. उधारीचा व्यवहार वाढला आहे अशी खंत ते व्यक्त करत आहेत.