पश्चिम बंगालमधील सिलगुडी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याचा आऱोप असून याविरोधात संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आहे. रविवारी संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शन करण्यात आलं. कोलकातापासून ५०० किमी अंतरावर असणाऱ्या ठिकाणी जवळपास दोन तास आंदोलन सुरु होतं. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी जमावाकडून हिंसाचार सुरु झाला. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दुपारी दोन वाजता सुरु झालेलं हे आंदोलन अनेक तास सुरु होते. आंदोलकांनी यावेळी तीन बसेस आणि पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास आंदोलक दुसऱ्या ठिकाणी गेले आणि पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केला. एका क्षणी स्थानिक पोलिसांवर धनुष्य आणि बाणाच्या सहाय्याने हल्ला करत होते.

हत्या करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, “मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने शोध सुरु केला होता. अखेर एका झाडाखाली तिचा मृतदेह सापडला होता”. स्थानिकांनी मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन सायकल आणि मोबाइल फोन सापडले आहेत.

पश्चिम बंगाल पोलिसांनी मुलीचा शवविच्छेदन अहवाल ट्विट केला असून विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आहे. तसंच शरीरावर कोणतीही जखम झाली नसल्याचं सांगत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा फेटाळला आहे. दरम्यान प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच आंदोलनाला सुरुवात झाली होती. पोलिसांनी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.