Analysis of Trump’s Intervention Plans in Venezuela and Iran : मुंबई : व्हेनेझुएला पाठोपाठ इराणमध्येही हस्तक्षेप करून तेथे सत्ताबदल करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षा वारंवार प्रकट होताना दिसते. एखाद्या सार्वभौम देशामध्ये अशा प्रकारची ढवळाढवळ करणे हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संकेतांना धरून नाही. पण या दोन्ही देशांमध्ये अमेरिकी हस्तक्षेप ‘लोकशाही प्रस्थापित’ करण्यासाठी होतो आहे, हा दावा खरा मानणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचेच दिसून येत आहे.
यातूनच इराणमध्ये शेकड्यांनी मृत्युमुखी पडत असूनही तेथील धर्मसत्ता विरोधकांची निदर्शने कमी झालेली नाहीत आणि ट्रम्प यांनीही या आंदोलकांना ‘लढा सुरू ठेवा, मदत येत आहे’ या स्पष्ट शब्दांमध्ये आश्वस्त केले. तिकडे व्हेनेझुएलामध्ये अध्यक्ष निरोलस मदुरो यांना ट्रम्प प्रशासनाने ‘पळवून’ अमेरिकेते नेले, पण या कृतीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या तेथे लक्षणीयरीत्या अधिक आढळते. ‘दि इकॉनॉमिस्ट’सारख्या प्रतिष्ठित मासिकाने घेतलेल्या सर्वेक्षण चाचणीत अर्ध्याहून अधिक सहभागींनी अमेरिकेच्या काारवाईला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेविषयी आपले मत या कारवाईनंतर बदलल्याचेही त्यांनी नमूद केले.
मदुरोंविषयी राग का?
निकोलस मदुरो हे २०१३पासून व्हेनेझुएलाचे सत्ताधीश होते. २०२४मध्ये त्या देशात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मदुरो यांना त्यांचे प्रतिस्पर्धी एडमुंडो गोन्झालेझ यांच्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. पण मदुरोंच्या प्रभावाखाली तेथील निवडणूक यंत्रणेने हा निकाल ग्राह्य न मानता, मदुरो यांनाच विजयी केले. मुळात एडमुंडो गोन्झालेझ मदुरो यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी मारिया कोरिना मच्याडो यांनी पाठिंबा जाहीर केला होता. कारण मच्याडो यांच्यावर निवडणूक लढवण्यावर बंदी घालणारा आदेश मदुरो सरकारने २०२३मध्ये जारी केला होता. मच्याडो यांना यंदाचे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. मदुरो यांनी त्यांचा छळ चालवल्यामुळे त्या गेले काही महिने भूमिगत होत्या.
मच्याडो यांनीही अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा देत ट्रम्प यांचे कौतुकही केले. मात्र, व्हेनेझुएलात लोकशाही प्रस्थपित करायची असेल, तर मच्याडो किंवा त्यांचे उमेदवार गोन्झालेझ यांचेे सरकार स्थापण्याविषयी कोणतेही आश्वासन ट्रम्प यांनी अद्याप दिलेले नाही. त्याऐवजी मदुरो सरकारमधील उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या हाती त्यांनी व्हेनेझुएलाची सूत्रे सोपवली आहेत. त्या देशाचे आपणच प्रभारी असल्याचाही दावा ते करत असतात. व्हेनेझुएलातील मोठ्या संख्येने जनतेला मात्र मदुरो यांच्या राजवटीचा कंटाळा आला आहे. मदुरो यांच्या अमदानीत लोकशाहीचे मातेरे झाले हे मच्याडो यांचे समर्थक विसरलेले नाहीत. त्यामुळे ट्रम्प तूर्त लोकप्रिय मच्याडो सरकारच्या स्थापनेत चालढकल करत असले, त्यासाठी प्रतीक्षा करण्याची व्हेनेझुएलातील जनतेची तयारी आहे.
इराणमध्ये धर्मसत्ताविरोधी रोष?
गेल्या वर्षी इराण इस्रायल आणि अमेरिकेचे हल्ले परतवून लावण्यात, तसेच इस्रायलवर प्रतिहल्ले करण्यात गुंतला होता. त्यामुळेविविध कारणांस्तव जवळपास मोडकळीस आलेल्या तेथील अर्थव्यवस्थेविरुद्ध रोष पुरेशा तीव्रतेने प्रकट झाला नाही. पण युद्धे संपली, तसे महागाईचे चटके जाणवू लागले. गतवर्ष संपत असताना म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस वाढत्या महागाईविरोधात तेथे निदर्शने होऊ लागली. ती दडपण्याचा प्रयत्न झाला तशी जनता आणखी भडकली. चार वर्षांपूर्वी इराणमध्ये अनेक ठिकाणी हिजाबविरोधी आंदोलने झाली, पण ती प्रामुख्याने मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. मात्र यावेळी ही आंदोलने ग्रामीण भागांत पसरली. तीत मोठ्या संख्येने मध्यमवयीन महिलाही सहभागी झाल्या. आंदोलने चिरडून टाकण्याचा प्रयत्न इराण सरकारकडून झाला. आतापर्यंत २०००हून अधिक आंदोलक पोलिस आणि निमलष्करी तुकड्यांच्या कारवाईत मृत्युमुखी पडले आहेत. त्याहीपेक्षा या आंदोलनांना अमेरिकेची फूस आहे असे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अली खामेनी यांनी म्हटल्या जनता अधिकच चवताळली.
अमेरिका आणि इस्रायलवर प्रतिसादात्मक हल्ले केले जातील. संपूर्ण आखातात आगडोंब उसळेल, अशा धमक्या इराणमधील धर्मसत्तेकडून दिल्या जात असल्यामुळे जनतेच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हे आंदोलन धर्मसत्तेच्या बंधनांमुळे संकोचलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी नसून आर्थिक मुद्द्यांवर सुरू आहे. गतवर्षी जूनमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या कारवाईत इराणची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या या देशात प्रतिहल्ला करण्याची क्षमता फारशी उरलेली नाही, असा अमेरिकेचा होरा आहे. ट्रम्प प्रशासन म्हणूनच एखादी कारवाई लवकरच हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणच्या शहाची सत्ता उलथवून १९७९मध्ये ते आयातुल्ला खोमेनी यांची धर्मसत्ता प्रस्थापित झाली. या शहाचे वंशज रझा पेहलवी इराणमध्ये परतण्याची चिन्हे आहेत. यासाठी प्रथम अमेरिकेची कारवाई गृहित धरली जाते. विद्यमान धार्मिक नेते अली खामेनी आणि अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे सरकार जनतेच्या रेट्यासमोर उलथवून रझा यांची सत्ता तेथे स्थापित करण्याविषयी हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे एरवी अमेरिकेविषयी संशय बाळगणाऱ्या इराणच्या सामान्य जनतेने या घडामोडींचे मूक स्वागतच केल्याचे जाणवते.
ट्रम्प नवे मसीहा?
व्हेनेझुएला किंवा इराण या दोन देशांतील एक प्रमुख साम्य म्हणजे, दोन्ही देशांत प्रस्थापित सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फायदा ट्रम्प प्रशासन उठवत आहे. यापूर्वीही अमेरिकेच्या सरकारांनी अनेक देशांमधील अस्थैर्याचा फायदा उठवून तेथील सरकार नेस्तनाबूत करण्याचे किंवा सत्ताधीशांना पदच्युत करण्याचे प्रकार केलेच आहेत. पण यावेळी फरक असा, की अमेरिकेच्या या प्रयत्नांना स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळताना दिसतो. याच मुद्द्यावर इतरही काही देशांमध्ये सत्ताबदल करण्याची ट्रम्प यांची योजना दिसते. पण हे देश व्हेनेझुएला किंवा इराणसारखे हुकूमशाहीसदृश नाहीत हेही खरे.
siddharth.khandekar@expressindia.com
