ल ग्वायरा, काराकास : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी लागोपाठ आलेल्या दोन भूकंपांमध्ये आतापर्यंत ५८९ जण जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली. त्याशिवाय शुक्रवार सकाळपर्यंत बेपत्ता व्यक्तींची संख्या ५० हजार नोंदवण्यात आली आहे. यामुळे व्हेनेझुएलात मोठी मनुष्यहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. भूकंपग्रस्त भागांमध्ये बचावकार्यासाठी परदेशी पथके पोहोचत आहेत. दुसरीकडे, भूकंपांना दोन दिवस झाल्यानंतर स्थानिक हाताने ढिगारा उपसून त्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये आणि लगतच्या प्रदेशांमध्ये दुहेरी भूकंपांमुळे मोठे नुकसान होऊन अनेक इमारती आणि बांधकामे जमीनदोस्त झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अजून शेकडो लोक अडकले असल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. आतापर्यंत ५८९ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून २,९८० जण जखमी झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
बेपत्ता लोकांची नोंद करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळपर्यंत ५० हजार जणांची नोंद करण्यात आहे. ‘यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे’ने यामध्ये १० हजारांपेक्षा जास्त जण मरण पावले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भूकंपांचा फटका जवळपास ७० लाख लोकांना बसला असावा असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांविषयी संघटनेने व्यक्त केला.
बुधवारी संध्याकाळी काराकासच्या पश्चिमेला १६० किमी अंतरावर ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंप झाले. व्हेनेझुएलाच्या आधुनिक इतिहासातील यांची सर्वात तीव्र भूकंपांमध्ये नोंद झाली आहे. बुधवारी व्हेनेझुएलात सार्वजनिक सुटी होती. लोक सुटीचा आनंद घेत असतानाच निसर्गाने तडाखा दिला.
काराकासला लागून असलेल्या ल ग्वायरा या समुद्रकिनाऱ्यावरील शहरामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. तिथे गगनचुंबी इमारतींसह किमान १०० इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. ढिगाऱ्यांखालून कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे लोक ठिकठिकाणी दिसत आहेत. स्थानिक पातळीवर अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस आणि सैन्य काही भागांमध्ये मदतकार्य करत आहे. पण काही ठिकाणी ते पोहोचलेले नाहीत किंवा त्यांचे अस्तित्व अगदी नगण्य आहे.
“माझी इमारत राहण्याजोगी राहिलेली नाही आणि माझ्याकडे काहीच नाही. मी आणि माझा मुलगाच आहोत,” असे भूकंपातून वाचलेले सुहेल सरक्विझ यांनी सांगितले. तर, आम्ही सर्व काही गमावले असे पेद्रो पेरेझ म्हणाले. त्यांचे घर आणि व्यवसाय दोन्ही नष्ट झाले आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलांसह रस्त्यांवर राहत आहेत. मदत लवकर पोहोचावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मदत पोहोचण्यास सुरुवात
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुखांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना सर्वांना मदतीचे आश्वासन दिले असून देश-विदेशातून मदत यायला सुरुवात झाली आहे. नुकसान झालेली रुग्णालये आणि घरांसाठी २० कोटी डॉलरचा निधी उभारला जात असल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. ल ग्वायरा येथे डॉमिनिकन रिपब्लिकनची मदत सर्वात आधी पोहोचली. बचावकार्यासाठी मेक्सिकोचे २५०, एल साल्वादोरचे १८८, स्पेनचे १०० आणि कोलंबियाचे ६३ सैनिक रवाना झाले आहेत. चिलीमधूनही मदत दाखल झाली आहे. स्वित्झर्लंड आणि जर्मनीने बचाव पथकांसह, श्वानपथके, ध्वनी उपकरणे आणि विशेष गिअर पाठवले आहेत. अमेरिका १५ कोटी डॉलरची मदत पाठवत आहे.
अन्य घडामोडी
– काराकास आणि अन्य भूकंपग्रस्त शहरांमध्ये शेकडो लोकांनी उद्याने, पार्किंगच्या जागा आणि अन्य खुल्या जागांमध्ये रात्र घालवली
– भूकंपाचा केंद्रबिंदू कॅरेबियिन देशांच्या किनाऱ्यावरील मोरोनजवळ, तेथे घरांचे मोठे नुकसान, पाणी व वीजपुरवठा खंडित
– व्हेनेझुएलातील तेल प्रकल्पांचे फारसे नुकसान झाले नसल्याची परदेशी कंपन्यांची माहिती
– काराकास स्टॉक एक्सचेंज बंद राहिला, तिथे मदत संकलन केंद्र सुरू
– व्हेनेझुएलातील आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक भूकंप १९६७मध्ये झाला होता, त्यावेळी २४० जण ठार झाले होते
भारताचे ‘ऑपरेशन अमिस्टाड’
व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन अमिस्टाड’ मोहीम सुरू केली असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी जाहीर केले. अमिस्टाड या स्पॅनिश शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. ‘ऑपरेशन अमिस्टाड’अंतर्गत हवाई दलाच्या सी-१७ विमानातून वैद्यकीय मदत आणि ३५ टनांपेक्षा अधिक मदत सामग्री पाठवली जात आहे.
‘ऑपरेशन अमिस्टाड’अंतर्गत फिरते लष्करी रुग्णालय आणि ३५ टनांपेक्षा जास्त मानवतावादी मदत तातडीने पाठवली जात आहे. त्यामध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि भीष्म क्युब ही अत्याधुनिक, आपत्कालीन सहाय्य यंत्रणा पाठवली जात आहे. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
