काराकास : व्हेनेझुएलाची राजधानी काराकास आणि आजूबाजूचा परिसर बुधवारी दुपारी दोन तीव्र भूकंपांनी हादरला. या भूकंपात हजारो नागरिक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत असून, इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकले आहेत. गुरुवारी सकाळीही भूकंपानंतरचे धक्के या भागाला बसले. त्याचीही तीव्रता अधिक होती. हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी भूकंपात १६४ जणांचा मृत्यू आणि ९७१ जण जखमी झाल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या ‘पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्रा’ने भूकंपानंतर त्सुनामीचे इशारे दिले. मात्र, लगेच ते मागे घेण्यात आले.

अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काराकासच्या पश्चिमेला १६० किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारी पहिला ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतरच्या मिनिटातच आणखी एक ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्क्याची नोंद झाली. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी भूकंपामध्ये १६४ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. मात्र, हा आकडा खूप मोठा असण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळतानाची दृश्ये टिपली गेली आहेत.

काराकासमधील मुख्य विमानतळाचे नुकसान झाले असून, तो बंद करण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने १० हजारांहून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली आहे. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी ‘एक्स’वर मोहीम चालविण्यात येत असून, तिथेही गुरुवारी सकाळपर्यंत १० हजारांहून अधिक बेपत्ता झाल्याची नोंद होती. कोलंबियामधील कॅरिबिअन आणि ईशान्येकडील भागातही भूकंप जाणवला.

व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज म्हणाल्या, ‘सध्या बचावकार्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित आहे. इतर देशांतूनही बचावकार्यासाठी पथके दाखल होत आहेत. राजधानीतील विमानतळ बंद करण्यात आले आहे.’ रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प यांनी संकटकाळात मदतीसाठी अमेरिका तयार असल्याचे विधान केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्हेनेझुएला मानवी हक्क आयोगाने स्थानिक पातळीवरील सामाजिक माध्यमांवरील बंदी उठविण्याची मागणी केली.

व्हेनेझुएलामध्ये सार्वजनिक सुटीच्या दिवशी हा भूकंप झाला. भूकंपानंतर बचावकार्याला तातडीने सुरुवात झाली. घटनास्थळावरील दृश्ये भीषण होती. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आप्तेष्टांना सोडविण्यासाठी आर्त हाक देत होते. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात होते. रस्त्यावर एका भयपटाचेच वातावरण असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

भूकंपानंतरच्या कंपनामुळे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, प्रशासनाने नागरिकांना मोकळ्या जागी थांबण्याचे आवाहन केले आहे. भूकंपामुळे अनेक ठिकाणी वीज गेली असून, मोबाइल फोन लागेनासे झाले आहेत. मोबाइल फोन ठप्प झाल्यामुळे अनेकांच्या तणावात भर पडली आहे. त्यामुळे अनेक शाळांना सुटी देण्यात आली असून, काही शाळा या निर्वासितांसाठी तात्पुरत्या छावण्या म्हणून वापरल्या जाणार आहेत.

व्हेनेझुएला भूकंपप्रवण क्षेत्रात येत असून, यापूर्वी १८१२ मध्ये झालेल्या भूकंपात ३० हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.

अनेक इमारती कोसळल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर बचावमोहीम आम्ही राबवीत आहोत. अनेकांना वाचविण्याची शर्थ आम्ही करीत आहोत. ला ग्वैरा राज्यात भीषण स्थिती आहे. – डेल्सी रॉड्रिग्ज, हंगामी अध्यक्ष, व्हेनेझुएला

‘आवश्यक ती सर्व मदत करण्यास भारत तयार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलातील घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचे म्हटले आहे. मोदी यांनी ‘एक्स’वर टिप्पणी केली, ‘‘व्हेनेझुएलातील भीषण भूकंपानंतर झालेली हानी पाहून तीव्र दु:ख झाले. भारतीय नागरिकांच्या वतीने या घटनेत जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी शोक व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याची प्रार्थना आम्ही करतो. या कठीण काळात आवश्यक ती सर्व मदत करण्यास भारत तयार आहे.’’

जपानमध्येही ७.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप

टोकियो : जपानच्या उत्तर किनाऱ्याला गुरुवारी सकाळी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. मात्र, त्सुनामीचा कुठलाही धोका नसून, या भूकंपात कुणीही जखमी झाले नसल्याचे जपानच्या हवामान विभागाने सांगितले. हा धक्का टोकियोसह ईशान्य जपानमध्ये विविध शहरांत जाणवला.