वृत्तसंस्था, ल ग्वायरा

व्हेनेझुएलाला दुहेरी भूकंपाचे धक्के बसून मंगळवारी सात दिवस पूर्ण झाले असून ढिगाऱ्याखालून जिवंत व्यक्तींचा शोध लागण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. असे असले तरीही सामान्य नागरिक आणि बचाव पथकाच्या सदस्यांनी ढिगाऱ्यांखाली शोध घेणे थांबवलेले नाही. दरम्यान, उत्तर व्हेनेझुएलाच्या ल ग्वायरा येथे सोमवारी ४.६ तीव्रतेचा भूकंपाचा आणखी एक धक्का बसला.

दुहेरी भूकंपांमधील मृतांचा आकडा १,७००पेक्षा जास्त झाला असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे हजारो लोक बेघर झाले असून त्यांना निवारा प्रदान करण्यासाठी आर्थिक संकटातील सरकारकडे कोणत्या उपाययोजना आहेत, या प्रश्नाची कोणतीही उत्तरे मिळालेली नाहीत. या भूकंपांमुळे व्हेनेझुएलाला पुढील कित्येक वर्षे मानवी संकटांचा सामना करावा लागू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

बचाव व मदत पुरवठा करणाऱ्या संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक संकटानंतरचे सुरुवातीचे ७२ तास बचावकार्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. अडकलेल्या व्यक्तींपर्यंत अन्न आणि पाण्याचा पुरवठा करणे शक्य झाले तर त्यांची वाचण्याची शक्यता वाढते. भूकंपग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यात प्रशासन कमी पडत असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी ल ग्वायरा येथे सोमवारी डबाबंद अन्नपदार्थांचे वाटप केले.

दुसरीकडे, हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांचे बंधू आणि व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे नेते जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, “ल ग्वायरामध्ये ९० टक्के विद्युतपुरवठा पूर्ववत झाला आहे. अजूनही धोकादायक असलेल्या इमारतींचे मूल्यांकन केले जात असून १५ तात्पुरती निवारा शिबिरे उभारण्यात आली आहेत.”

भारताच्या मदतीची प्रशंसा

काराकास : भारताने भूकंपग्रस्तांसाठी पाठवलेल्या मदतीची व्हेनेझुएलाने प्रशंसा केली आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन अमिस्टाड’अंतर्गत काराकास येथील ‘इंटरनॅशनल ल रिंकोनाडा रेसट्रॅक’ येथे फिरते रुग्णालय उभारले असून अनुभवी डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री अँड्रिया कोराओ फारिया यांनी या रुग्णालयाला भेट दिली. ‘ऑपरेशन अमिस्टाड’अंतर्गत हवाई दलाने दोन ‘सी-१७’ ग्लोबमास्टर विमानांतून ६६ टन मदत पाठवली आहे. त्यामध्ये ३५ टन मदतसामग्री, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा, तसेच अत्याधुनिक वैद्यकीय साधनांचा समावेश आहे.

आरोग्य व्यवस्थेवर ताण – जागतिक आरोग्य संघटना

जीनिव्हा : भूकंपांमुळे व्हेनेझुएलाच्या आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी सांगितले. या भूकंपांमध्ये किमान तीन आरोग्य केंद्रांचे प्रंचड नुकसान झाले आहे, तसेच सहा रुग्णालयांचे नुकसान झाले असून ती बंद आहेत किंवा अंशतः सुरू आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडयमार यांनी सांगितले.