पीटीआय, नवी दिल्ली

व्हेनेझुएलामधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अमिस्टाड’ अंतर्गत वैद्यकीय साहित्य, रुग्णालयाचे एक पथक आणि बचावपथकासाठीची साधने पाठविली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. या मदतीमुळे तेथील बचावकार्याला वेग येईल, असे ते म्हणाले.

जयशंकर यांनी ‘एक्स’वर टिप्पणी करून व्हेनेझुएलामधील भारत करीत असलेल्या मदतीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘भारताची मदत व्हेनेझुएलामध्ये पोहोचली आहे. रुग्णालयाचे पथक, बचावपथकासाठीचे साहित्य, औषधे आणि वैद्यकीय साहित्य पाठविण्यात आले असून, त्यामुळे बचावकार्याला वेग येईल.’

भारताच्या वैद्यकीय पथकाने व्हेनेझुएलामध्ये पोहोचताच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. तेथील भूकंपग्रस्तांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय पथकांमध्ये अनुभवी डॉक्टरांचा समावेश असून, राजधानी काराकास येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक छावणी उभारण्यात आली आहे. रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी दोन फिरते दवाखानेही व्हेनेझुएलामध्ये रवाना करण्यात आले आहेत.

हवाई दलानेही या संदर्भात माहिती दिली असून, ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ विमाने व्हेनेझुएलामध्ये पोहोचल्याचे सांगितले. सुमारे २३ तासांचा आणि १४ हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून ही विमाने व्हेनेझुएलामध्ये पोहोचली आहेत, अशी टिप्पणी हवाई दलाने ‘एक्स’वर केली. विमानातून ६६ टन मदतीचे साहित्य रवाना करण्यात आले आहे. ४१ जणांच्या बचाव पथकाचाही यामध्ये समावेश आहे.

या कठीण प्रसंगात भारत व्हेनेझुएलाबरोबर ठामपणे उभा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.