Venezuela Earthquake 2026 : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी अवघ्या ३९ सेकंदांच्या अंतराने झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी प्रचंड खळबळ उडाली आहे. रिक्टर स्केलवर ७.२ आणि ७.५ तीव्रतेच्या या जुळ्या भूकंपांमुळे राजधानी कराकससह अनेक शहरे हादरली. या नैसर्गिक आपत्तीत रस्ते मधोमध दुभंगले असून अनेक इमारतींना मोठे तडे गेले आहेत, तर काही घरे पत्त्यासारखी कोसळली आहेत.
३९ सेकंदांत दोन मोठे धक्के
युएस जिओलॉजिकल सर्व्हे नुसार, पहिला धक्का रात्री १०:०४ वाजता सॅन फेलिप शहराजवळ बसला, ज्याची तीव्रता ७.२ एवढी होती. या धक्क्यानंतर नागरिक सावरत नाहीत तोच, अवघ्या ३९ सेकंदांनंतर युमारे शहराजवळ ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली मुख्य धक्का बसला. हे दोन्ही भूकंप एकमेकांपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर आणि वेगवेगळ्या खोलीवर झाले. याचे धक्के शेजारील देश कोलंबियामध्येही जाणवले.
भयानक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल
भूकंपानंतरचे अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये विमानतळावरील प्रवासी जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कराकस मधील एका बहुमजली इमारतीच्या छतावरील स्विमिंग पूलचे पाणी जमिनीवर धबधब्यासारखे कोसळताना दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांना मोठमोठे तडे गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आपत्कालीन पथकांमार्फत नागरिकांना ढिगार्याखालून काढण्याचे शर्तीचे प्रयत्न दिसून येत आहे.
हजारो नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती
USGS ने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, या आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा १०,००० ते १,००,००० च्या दरम्यान असू शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे अंतर्गत मंत्री डीओस्डाडो कॅबेलो यांनी सरकारी टेलिव्हिजनवर सांगितले की, “राजधानी कराकसमध्ये काही इमारती आणि घरे कोसळली आहेत. प्रशासन सध्या नुकसानाचा आढावा घेत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “घरातील फ्रीज आणि कपाटांमधील वस्तू जमिनीवर पडल्या. असा भयानक अनुभव कधीच आला नव्हता.” ८० वर्षांच्या एका वृद्ध महिलेने सांगितले की, “हा भूकंप १९६७ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपापेक्षाही जास्त भयानक होता.”
सध्या कराकस आणि इतर प्रभावित भागांत अग्निशामक दल आणि आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. पुढील काही तास भूकंपानंतरचे लहान धक्के येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
