दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात एका ३३ वर्षीय भारतीय खलाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता मात्र या प्रकरणाला अत्यंत भयानक आणि गूढ वळण मिळालंय. मृत खलाशाचा मृतदेह भारतात आणल्यानंतर, त्याच्या शरीरातील हृदय, मेंदू आणि फुफ्फुस हे महत्त्वाचे अंतर्गत अवयव गायब असल्याचं उघडकीस आलं आहे. राकेश चौहान असं या खलाशाचं नाव असून, या प्रकारामुळं त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. ‘फेडरेशन ऑफ सीफेअर्स युनियन्स ऑफ इंडिया’ (FSUI) या खलाशांच्या संघटनेने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक सत्य उघड
राकेश चौहान यांचा मृतदेह व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही शवविच्छेदन (ऑटोप्सी) अहवाल किंवा मृत्यूची सविस्तर माहिती न देता थेट उत्तर प्रदेशातील देवरिया या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला होता. कंपनीने दिलेल्या संशयास्पद माहितीमुळे कुटुंबीयांनी भारतात पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भारतात करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालातून एक अंगावर काटा आणणारे सत्य समोर आले आहे. राकेश यांच्या शरीरात एकही अंतर्गत अवयव शिल्लक नव्हता.
अहवालानुसार गायब झालेले अवयव:
- मेंदू आणि हृदय
- दोन्ही फुफ्फुसे
- यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड
- प्लीहा, स्वादुपिंड आणि जठर
- आतडे, थायरॉईड आणि श्वसननलिका
तसेच राकेश यांच्या मृतदेहावर मानेपासून पोटापर्यंत २२ टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत २१ टाके घालण्यात आले होते. मृतदेह जवळपास महिनाभर डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. शरीरात एकही अवयव शिल्लक नसल्यामुळे भारतीय डॉक्टरांना त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करता आले नाही.
कंपनीने बदलली भूमिका; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
राकेश चौहान हे नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘एक्सफिनिटी’ (Xfinity) नावाच्या कंपनीमार्फत मर्चंट नेव्हीच्या जहाजावर कामासाठी व्हेनेझुएलाला गेले होते. मे महिन्यात कंपनीने राकेश यांच्या मृत्यूची बातमी दिली आणि ६० दिवसांच्या आत मृतदेह भारतात आणण्याचे आश्वासन दिले.
राकेश यांचे वडील रामदेव चौहान यांनी सांगितले की, “आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं. सुरुवातीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोनवर सांगितलं की, राकेश जहाजावर पडल्यामुळे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या वाचण्याची शक्यता फक्त ५ टक्के असल्याचे सांगण्यात आलं आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. जेव्हा आम्ही मृत्यूचे कारण विचारलं, तेव्हा पडल्यामुळं झालेल्या गंभीर जखमांमुळं त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं.”
तसेच कंपनीनं आठवड्याभरात मृतदेह सोपवण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र तब्बल एका महिन्यानंतर, म्हणजेच ४ जून रोजी मृतदेह देवरिया येथे पोहोचला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासाची मागणी
परदेशात भारतीय कामगारांसोबत होणारी वागणूक आणि तिथल्या यंत्रणांची पारदर्शकता यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पहिल्या शवविच्छेदनादरम्यान काही अवयव चाचणीसाठी काढले जातात. परंतु, व्हेनेझुएला सरकार किंवा संबंधित कंपनीने यापैकी कोणत्याही गोष्टीची स्पष्ट माहिती दिलेली नाही.
या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत खलाशांच्या संघटनेने (FSUI) म्हटले आहे की, “हे अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. भारतीय खलाशांना अशा प्रकारे बळीचा बकरा बनवले जात आहे. आम्ही व्हेनेझुएला सरकारकडून या प्रकरणाची जबाबदारी आणि पूर्ण चौकशीची मागणी करतो. व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा, मूळ मृत्यूचा अहवाल मिळवावा आणि पीडित कुटुंबाला न्याय व योग्य भरपाई मिळवून द्यावी.”
