अमेरिकेने शनिवारी भल्या पहाटे अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेन्स यांना ताब्यात घेतले. अमेरिकेने १९९०मध्ये पनामात केलेल्या हल्ल्यानंतर दक्षिण अमेरिकेतील ही सर्वात थेट कारवाई ठरली आहे. व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्यांचे वर्णन ‘साम्राज्यवादी हल्ला’ असे केले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी लॅटिन अमेरिकेतली इतर देशांनाही इशारा दिला आहे.
ड्रग्स उत्पादन करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्या लॅटिन अमेरिकेतली मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला असून वेनेझुएलानंतर तुमच्या देशांवर हल्ले होऊ शकतात असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर होत नाही तोपर्यंत आम्ही त्या देशाचा कारभार पाहू,” अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी केली.
अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये वाद कशामुळे?
अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे- व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. यादरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती.
दरम्यान, लॅटिन अमेरिकेतली मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया या देशांतही अंमली पदार्थांचं उत्पादन केलं जातं. त्यामुळे वेनेझुएलानंतर या देशांनाही लक्ष्य करण्यात येणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात व्हेनेझुएलात ४० जणांचा मृत्यू
अमेरिकेने व्हेनेझुएलातील कराकस शहरावर केलेल्या हवाई हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला होता. त्यात एकूण ४० नागरिक व सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. व्हेनेझुएलाच्या लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
भारताने काय म्हटलं?
व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. रशियाने यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर भारताची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून संपूर्ण परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच ‘व्हेनेझुएलाच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षिततेसाठी भारत आपला पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर करतो’, असं भारताने म्हटलं आहे.
